Saturday, April 11, 2026
Latest NewsPUNE

पूर्व भागात भव्य व दिमाखदार मिरवणुकीद्वारे शिवरायांना नमन

पुणे : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेल्या दिमाखदार रथावर विराजमान झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती… रांगोळीच्या पायघडया व फुलांची उधळण…पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… ढोल-ताशांचा गजर आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात मुख्य अयोध्या रथ हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणेचे उपसभापती दत्तात्रय पायगुडे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, राजर्षी शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचे यंदा ४१ वे वर्ष आहे.

मुख्य रथावरील शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. यावेळी केरळ येथील चेंदा मेलम वाद्यपथक हे उपस्थितांसाठी विशेष आकर्षक ठरले. यावेळी शिवभक्तांनी व महिलांनी सामुहिक शिवआरती देखील केली.

मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळ प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता व लहान मुलांकरिता देखील विविध स्पर्धांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading