शिक्षणाचा आशय भारतीयता जपणारा असावा – डॉ. हरीश शेट्टी
कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कावेरी काऊंसिलिंग युनिटच्या ३० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेच्या एरंडवणे येथील जी एम शेट्टी मेमोरियल हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मानसतज्ज्ञ डॉ. कीर्ती पै, मानसतज्ज्ञ मुक्ती शहा, संस्थेच्या सहसंचालिका डॉ. देवसेना देसाई, फ्रेनी तारापोर, देविका नाडिग, डॉ. शोभा जोशी आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. शेट्टी यांनी दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून ‘सिग्निफिकन्स ऑफ मेंटल अॅंड इमोशनल वेलबिईंग ऑफ चिल्ड्रेन अॅंड अॅडोलेसन्स अॅंड इट्स इम्पॅक्ट ऑन अॅडल्टहूड’ या विषयावर आपले विचार मांडले. “स्वतःवरचा विश्वास मुलांमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे असून, मुलांमध्ये कोवळ्या वयात दिसून येणारी हिंसेची किंवा गुंडगिरीची लक्षणे, आक्रमकता, गॅजेट्सवरील अवलंबित्व, एकाग्रता नसणे असे धोके त्यांच्यातील आत्मविश्वास जागविल्यास कमी करता येतात. मुलांसह एकत्र वेळ घालवणे, कौटुंबिक उपक्रम सुरू ठेवणे, क्वालिटी टाईम देणे, मुलांवर पहारे न देता पालकत्वाच्या भूमिकेने दृष्टी ठेवणे महत्त्वाचे आहे. पालकांसह शिक्षकांनी हे लक्षात ठेवल्यास सर्वच वयोगटांतील विद्यार्थ्यांचा प्रवास जेलसीकडून जॉयफुलनेसकडे होईल”, असे डॉ शेट्टी म्हणाले.
डॉ. मोहन आगाशे यांनी ‘नर्चरिंग मेंटल हेल्थ इन अ डिजिटल एज – मॅनेजिंग टेक्नॉलॉजी अॅंड मेंटल वेलबिईंग’, या विषयावर बोलताना सध्या माहितीचा भडिमार आहे पण अनुभवांची वानवा असल्याचे निरीक्षण नोंदवले. यावेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले, “आपल्या धोरणकर्त्यांनी सर्वसाधारण पद्धतीची औपचारिक शिक्षणाची रीत रूढ केली आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र, वेगळे आणि अनेक शक्यता निर्माण करणारे असते, या मूलभूत घटकाचा त्यात फारसा विचार झालेला नाही. तो विचार झाला पाहिजे आणि त्यासाठी विचार आणि भावना तसेच आजच्या डिजिटल युगात वास्तव आणि आभासी विश्व, यांच्यातील विवेकी स्वरुपाचा समतोल अत्यावश्यक आहे.”
मालती कलमाडी यांनी कावेरी काऊंसिलिंग युनिट ही समर्पण, निष्ठा आणि परिश्रमांतून सुरू असलेली संस्था असून ती आज उल्लेखनीय वाटचाल करीत असल्याचे सांगितले. “३० वर्षांच्या काळात युनिटने काळानुरूप अनेक बदल घडवले आहेत. अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. दस्तेऐवजीकरण, वैचारिक देवाणघेवाण आणि सातत्याने सुरू असलेला संवाद या त्रिसूत्रीवर युनिटने समुपदेशन क्षेत्रात ठसा उमटवला असल्याचे त्या म्हणाल्या. आगामी काळात संस्थेच्या वतीने सर्टिफिकेट कोर्स तसेच प्ले थेरपी सुरू होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. देवसेना देसाई यांनी कावेरी काऊंसिलिंग युनिटची ३० वर्षांची वाटचाल युनिटचा अनुभव, आलेल्या केस स्टडी या मुद्यांच्या आधारे उलगडली. डॉ. कीर्ती पै यांनी समुपदेशन क्षेत्रातील नैतिकता तसेच काही मर्यादा आदी संकल्पनांची माहिती दिली. डॉ. साधना नातू यांनी समुपदेशन क्षेत्रातील इच्छुकांची विविधता स्पष्ट केली. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता अथवा भेदभाव न करता समुपदेशकाने समग्र समाजाकडे एकसंध दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील मुले आणि आर्थिक सुसंपन्न घटकातील मुले यांमधील दरी बाजूला ठेवून एक सर्वसमावेशक आणि मैत्रीपूर्ण संबंध जोडणे, हे आव्हानात्मक असल्याचे त्या म्हणाल्या.
मानसतज्ज्ञ मुक्ती शहा यांनी समुपदेशकाला सामोरे जाव्या लागणाऱ्या आठ अस्वस्थतांबद्दल चर्चा केली. स्मिता प्रधान, दीपा काजळे, समृद्धी कर्णिक आणि शुभदा कर्णिक यांनी कावेरी समुपदेशन युनिटद्वारे अवलंबिल्या जाणाऱ्या समुपदेशनातील सर्वोत्तम पद्धतींची माहिती उपस्थितांना दिली.
