गानसरस्वती महोत्सवाचे चौथे सत्र रसिकांच्या उदंड प्रतिसादाने गाजले
पुणे : : गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रावर विख्यात गायिका डॉ. अश्विनी भिडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीचा ठसा उमटला. अश्विनीताईंनी गायिलेल्या मिया की तोडी, यमनी बिलावल, अल्हैया बिलावल आणि हिंडोलपंचम रागातील रचना रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील, इतक्या रंगल्या. त्यांच्या गायनाला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली.
नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित अकराव्या ‘गानसरस्वती महोत्सवा’च्या चौथ्या सत्राचा प्रारंभ प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांनी राग बैरागीने केला. उस्ताद अमान अली खाँ यांच्या दोन रचना त्यांनी सादर केल्या. मध्यलय रूपक तालातील रचना व त्याला जोडून शौनक यांनी द्रुत त्रितालातील बंदिश सादर केली. त्यानंतर शौनक यांनी नंदभैरव रागातील बंदिशी सादर केल्या. ‘रे मन मूरत’ या रचनेला विशेष दाद मिळाली.
त्यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) यांनी अनुरूप साथ केली. करण देवगावकर, राज शहा, सत्यजीत बेडेकर आणि अभेद अभिषेकी यांनी तानपुरा साथ केली.

रसिकांशी संवाद साधताना शौनक अभिषेकी म्हणाले,” हे व्यासपीठ ज्यांच्या नावाने आहे, त्या किशोरीताईंकडून भजन शिकण्याची संधी मिळाली. सर्व पूर्वसुरी गुरुजन हे मला संगीतातील संत, योगी वाटतात. वरवरचे काही फरक वगळले तर हे सारे बुजुर्ग कुठल्या ना कुठल्या स्तरावर समान विचार करत असल्याचे जाणवते. किशोरीताई शिकवताना एक ओळ शिकवून आता ‘चालव’ असे सांगायच्या. सुरवातीला मला हे ‘चालव’ प्रकरण उमगले नव्हते. मग रघुदादाने सांगितले की, चालव म्हणजे जरा सजव आणि विस्तार कर…ही आठवण सांगून शौनक यांनी ‘अवचिता परमाळु झुळकला अळुयाळु ‘ ही रचना आणि ‘सुखाचे ते सुख’ ही भक्तिरचना ऐकवली.
सकाळच्या सत्राचा समारोप जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या अप्रतिम गायनाने झाला. त्यांनी राग ‘मिया की तोडी’ मध्ये ‘राज करो तुम या नगरीमे’ ही विलंबित त्रितालातील पारंपरिक रचना आणि त्याला जोडून स्वरचित ‘रघुवर दीजो तव पद रजसंकेत’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग ‘यमनी बिलावल’ मधील ‘प्रेम गलियनमे’ ही रचना आणि ‘अल्हैया बिलावल’ मधील पं. शंकर अभ्यंकर रचित तराणा त्यांनी गायिला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी हिंडोलपंचम (हिंगोली, सोहनी आणि शुद्ध मध्यम प्रयोग) रागातील उस्ताद अल्लादिया खाॅंसाहेबांची बंदिश आणि नंतर पं. बबनराव हळदणकर यांनी बांधलेला तराणाही त्यांनी पेश केला.
त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी गायनाची रंगत खुलवणारी साथसंगत केली. स्वरांगी मराठे आणि ऋतुजा लाड यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. तत्पूर्वी अश्विनी भिडे यांना नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाल्याबद्दल नाट्यसंपदा प्रतिष्ठान तसेच आमोणकर कुटुंबियांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, बिभास आमोणकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
