Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

स्वप्न झोपून नाही तर उघड्या डोळ्यांनी पहा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

पुणे : आज आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पुढे येऊन मोठे अधिकारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वप्न साकारण्याच्या ध्यास घेतला तर मार्ग मिळत जातात. आपल्याला नेहमी सांगितले जाते की, अंथरूण पाहून पाय पसरावेत परंतु आपण अंथरूण वाढविण्याचे स्वप्न का पाहत नाही? स्वप्न झोपून नाही तर उघड्या डोळ्यांनी पहा, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. मंंदिरावर फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत पुण्यातील हुजूरपागा मुलींची शाळा, रेणुका स्वरुप हायस्कूल, विद्या विकास विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, मॉडर्न हायस्कूल, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ.विमलाबाई गरवारे हायस्कूल या शाळांमधील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, काही वाईट झाले तर आपण लगेच भगवंताला बोलतो, परंतु चांगले झाले तर त्याला धन्यवाद म्हणायला येत नाही. आपण चांगल्या आणि वाईट गोष्टींचा हिशोब ठेवला तर लक्षात येईल की देव आपल्याला नेहमी चांगले देत असतो. कोरोना नंतर सर्वांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले, परंतु भारत यातून पटकन बाहेर आला. कारण आपल्या देशातील नागरिकांची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, अमिता अग्रवाल म्हणाल्या, दहावी नंतर काय करायचे ते आधीच ठरवायला हवे. आर्थिक अडचण आली तर ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच मदत मिळेल. मनात चांगले विचार ठेवून कार्य केले तर ते कार्य नक्की सफल होते. ट्रस्टच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध समाज उपयोगी उपक्रम देखील ब्रम्होत्सवात राबविण्यात येत आहेत.

उत्सवाचा प्रारंभ मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना करुन झाला. रविवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू या उत्सवमूर्तींची धान्य तुला होणार असून हे साहित्य किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत हे धान्य देण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल आणि रजत कमल अर्चना म्हणजेच उत्सवमूर्तींना सोन्याची व चांदीची फुले अर्पण करण्यात येतील.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading