Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

देवश्री नवघरे भिडे आणि पं. तेजेंद्र मुजुमदार यांचे स्मरणीय कलाविष्कार

गानसरस्वती महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ

पुणे : जयपूर अत्रौली घराण्याच्या युवा गायिका देवश्री नवघरे भिडे आणि सरोदवादक पं. तेजेंद्र मुजुमदार यांच्या स्मरणीय कलाविष्काराने अकराव्या ‘गानसरस्वती महोत्सवा’चे उद्घाटनाचे सत्र गाजले.

नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित ११ व्या गानसरस्वती महोत्सव २०२५ च्या सुरवातीला वेदमूर्ती समीर मिराशी आणि वेदमूर्ती स्वरूप दीक्षित यांनी मंगलाचरण केले. पं. रघुनंदन पणशीकर आणि अपर्णा पणशीकर यांनी त्यांचे स्वागत केले.

महोत्सवाचे प्रारंभीचे सत्र जयपूर अत्रौली घराण्याच्या युवा गायिका देवश्री नवघरे भिडे यांच्या दमदार गायनाने सुरू झाले. देवश्री यांनी गायनाची सुरवात राग गौरी मधील ‘आये राजन आये’ (विलंबित त्रिताल) या पारंपरिक ख्यालाने केली. त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘सुरत मोहनी देख’ ही रचना त्यांनी सादर केली. पाठोपाठ राग ‘तिलककामोद’ मध्ये ‘सूरसंगत रागविद्या’ ही गाजलेली बंदिश आणि तराणाही त्यांनी पेश केला. अतिशय सुरेल आवाज, उत्तम दमसास ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होती. सुरवातीला गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना विनम्र अभिवादन करुन, त्या म्हणाल्या,’ किशोरीताईंच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवात मला गायनाची संधी मिळाली ही मोलाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे. भारतीय संगीत परंपरेला वंदन करून मी माझी स्वरपूजा अर्पण करते,’. देवश्री यांना प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम) आणि सूर गोखले (तानपुरा) यांनी पूरक साथसंगत केली.

गानसरस्वती महोत्सवाचे दुसरे कलाकार प्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी राग छायानट सादर केला. आलाप, जोड आणि झाला, या क्रमाने पं. तेजेंद्र यांनी राग छायानट चे सौंदर्य उलगडले.वादनापूर्वी रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘मी या प्रतिष्ठित संगीत महोत्सवात प्रथमच वादन करत आहे. ही संधी पं. रघुनंदन पणशीकर यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे,’. पं. तेजेंद्र यांना लोकप्रिय तबलावादक सत्यजीत तळवलकर यांनी वादनाची रंगत खुलवणारी साथसंगत केली. ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर, सतारवादक उस्ताद शुजात खान, गायिका कलापिनी कोमकली, नंदिनी बेडेकर यावेळी उपस्थित होते. 

विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading