पद्मश्री हरिहरन आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने १८ व्या महोत्सवाचा समारोप
पुणे : ख्यातनाम गायक पद्मश्री हरिहरन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने १८ व्या महोत्सवाचा आज समारोप झाला. मागील तीन दिवस कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे १८ वा वसंतोत्सव रंगला. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने वसंतोत्सवचे आयोजन करण्यात आले होते.
राहुल देशमुख यांच्या ‘रिफ्लेक्शन्स या अल्बमचे प्रकाशन देखील यावेळी हरिहरन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
हरिहरन व राहुल देशपांडे यांनी ‘जियां जीयां ना जिया…’ ही गझल सादर करीत सहगायनाला प्रारंभ केला. त्यांनी आपले हे सादरीकरण उस्ताद झाकीर हुसैन यांना आदरांजली म्हणून अर्पण केले. यानंतर या दोघांनी ‘ याद पियां की आयें…’ ही रचना प्रस्तुत करील पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.
याआधी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी आपल्या सादरीकरणाने पुणेकरांवर जणू मोहिनी घातली. मुमताज राशिद साहेब यांच्या बेखयाली… या गझल ने त्यांनी मैफिलीचा आरंभ केला. यानंतर त्यांनी ‘ प्यारी अगर है जिंदगी…’ ही गझल सादर केली.
त्यानंतर झूम ले…, उज्र आने में भी…, ये आइने से शहर दर शहर… अशा काही गझल आणि बॉलीवूड मधे गाजलेली काश ऐसा कोई मंजर…, तू ही रे… आणि रोजा… ही गाणी सादर केली.
हरिहरन आणि राहुल देशपांडे यांना उस्ताद लियाकत अली खा (सारंगी), अकलाख वारसी (हार्मोनियम), शादाब शकुरी भारतीय (तबला), गौरव वासवानी (कीबोर्ड), संजय धास (गिटार) या कलाकारांनी साथ संगत केली.
आज महोत्सवासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन यांनीही आज महोत्सवाला भेट दिली. सुप्रसिद्ध गायन हरिहरन यांनीही यावेळी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा समोर बसून आस्वाद घेतला. स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
