Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

रझा यांच्या चित्रांत रंगांमधून रंगातीत होण्याची किमया; ज्येष्ठ चित्रकार अखिलेश यांचे मत

 

रझा यांच्या चित्रांच्या प्रिंट्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे : “चित्रकार रझा रंगांचा वापर विलक्षण निर्भयतेने करत असत. त्यांच्या चित्रांतील रंग परस्परांशी संवाद साधत आणि चित्ररसिकांना बांधून ठेवणारी रंगांची हार्मनी साधत असत. रंगांमधून रंगातीत होण्याची किमया त्यांची चित्रे करतात आणि रंगस्वभाव जाणून घ्यायला रसिकांना प्रवृत्त करतात”, असे मत भोपाळ येथील ज्येष्ठ चित्रकार तसेच नवी दिल्ली येथील रझा फाऊंडेशनचे अखिलेश यांनी मांडले.

प्रायोगिक रंगभूमीचे अवकाश विस्तारणाऱ्या आणि रंगभूमीला नवा आयाम देणाऱ्या ‘श्रीराम लागू रंग अवकाश’ या प्रकल्पाच्या वर्षपूर्ती आणि वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सेंटरच्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग अवकाश येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ज्येष्ठ चित्रकार सैयद हैदर रझा यांच्या चित्रांच्या प्रिंट्सच्या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते झाले. रझा फाऊंडेशनचे विशेष सहकार्य या चित्रप्रदर्शनासाठी लाभले आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत हिराबाग चौकातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या इमारतीत हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पं. मुकुल शिवपुत्र, चित्रकार अखिलेश, ज्येष्ठ कथक नृत्यांगना व नृत्यगुरू विदुषी गुरु शमा भाटे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख, प्रमोद काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रकार अखिलेश यांनी रझा यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ‘रझा यांच्या चित्रांमुळे मी चित्र कसे पाहायचे’, हे शिकलो. असेही ते म्हणाले. “रझा यांच्या चित्रांतील रंगलेपन आकर्षितही करते आणि आवाहनही करते. चित्ररसिकांशी त्यांची चित्रे रंगसंवाद करतात. रंगांचे पारंपरिक संकेत रझा यांच्या चित्रांतून निरनिराळे अर्थ व्यक्त करतात. थंड, शीत मानला जाणारा निळा रंग रझा यांच्या चित्रात जळण्याचा, पेटण्याचा अर्थ व्यक्त करतो. रझा यांच्या चित्रांमधून अनेक स्थित्यंतरेही अनुभवता येतात. निसर्गचित्रे करणारे रझा, नंतरच्या काळात अमूर्त चित्रांकडे वळलेले दिसतात. भौमितिक आकार, तंत्रविद्येतील यंत्रे, आकृत्या, बिंदूची निरनिराळी रूपे..रझा यांनी प्रामुख्याने अक्रेलिक माध्यमातून केलेली दिसतात. पॅरिस येथील वास्तव्यात केलेली चित्रे त्यांचा तेथील संघर्ष, गुंतागुंत, स्थित्यंतरे दर्शवतात आणि उत्तरायुष्यातील चित्रे त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांची चित्ररूपे दाखवतो”, असेही अखिलेश म्हणाले.

चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करताना पं. मुकुल शिवपुत्र म्हणाले, “संगीतकला ही श्रवणाश्रयी आहे. तशी चित्रकला ही दृष्यकला आहे. अनेक चित्रांमधूनही मी रझा यांचे चित्र नेमके ओळखू शकतो. संगीतासाठी जसा कान तयार व्हावा लागतो, तशी चित्रकलेसाठी नजर किंवा दृष्टी विकसित आणि समृद्ध असावी लागते”.

विदुषी गुरु शमा भाटे यांनी २००५ मध्ये रझा यांच्या चित्रांवर आधारित ‘नादबिंदू’ ही नृत्यसंरचना सादर केली होती. त्या संरचनेतील चित्रांवर आधारित भूमिकेविषयी शमाताईंनी विवेचन केले. “चित्रकला या माध्यमाकडे कथक नृत्याच्या माध्यमातून पाहताना, जे जाणवले, ते मांडण्याचा प्रयत्न नृत्य संरचनेतून केला. नाद ही संकल्पना प्रत्येक कलेच्या मूळाशी असतेच. बिंदू ही संकल्पना मी संगीतातील सम या संकल्पनेशी जोडली आणि आवर्तनांच्या रूपाने जोडत राहिले”, असे त्या म्हणाल्या. अनेक बिंदू मिळून रेषेला, रेषा आकारांना जन्म देते आणि ते आकार अवकाशाशी नाते जोडतात. रझा यांच्या चित्रांतून सातत्याने दिसणारे भौमितिक आकार आणि रंगच्छटा, यांना नृत्यातून प्रतिसाद देण्याचा माझा प्रयत्न होता, हे शमाताईंनी रझा यांच्या ओशन, फारेस्ट फायर, संसार आदी चित्रांमधून स्पष्ट केले. तसेच संरचनेचे काही अंशही दाखवले.

चित्रकार नितीन हडप यांनी सूत्रसंचालन केले तसेच मान्यवरांचा परिचय करून दिला व आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading