राजकवी भा. रा. तांबे यांच्या १५१ व्या जयंती वर्षाच्या निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन
पुणे : आधुनिक मराठीतील गीत काव्यांचे प्रवर्तक मानले जाणारे व दीड शतकाहून अधिक काळ आपल्या अजरामर कवितांनी मराठी मनावर राज्य करणारे, राजकवी भा.रा.तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांच्या १५१ व्या जयंती वर्षानिमित्त २०२५ मध्ये महाराष्ट्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याची माहिती तांबे कुटुंबियांच्या वतीने भा. रा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्या आजोबांचे संपूर्ण आयुष्य मध्य प्रदेशात व्यतीत झाले. पण त्यांनी लिहिलेल्या काव्यगीतांवर मराठी भाषिकांनी अतिशय अलौकिक प्रेम केले. त्यांच्या कवितांनी केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही सीमा ओलांडल्याने त्यांचा नावलौकिक सर्वदूर झाला. त्यांच्या काव्य-गीतांबद्दल अनेक थोर साहित्यिक, समीक्षकांनी लिहिले आहे. अनेक उत्कृष्ट संगीतकार जसे गजाननराव वाटवे, वसंत प्रभू, पं. हृदयनाथ मंगेशकर, दशरथ पुजारी, राम फाटक यांच्यासह कमलाकर भागवत, श्रीधर फडके यांनी कविवर्यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आणि गायक गजाननराव वाटवे, पं. कुमार गंधर्व, सुधीर फडके, भारतरत्न लता मंगेशकर, चिरतरुण आवाज असलेल्या आशा भोसले, मंदाकिनी पांडे, माणिक वर्मा यांनी त्यांची गीते गायलेली आहेत, जी आज इतकी वर्षे उलटल्यानंतरही मराठी रसिकांच्या हृदयात ताजी आहेत. म्हणूनच ती पुन्हा-पुन्हा गायली-ऐकली जातात, काना-मनात रुंजी घालतात. आजोबांना मराठी भावगीतांचे जनक असे कौतुकाने संबोधण्यात येते.
राजकवीचा सन्मान मिळण्यापूर्वी भा. रा. तांबे यांनी मध्य भारतात विविध मानाच्या पदांवर काम केलेलं होतं. देवास, इंदूर येथे युवराज शिक्षक, पिपलोदा संस्थानचे दिवाण, शोपूर संस्थानिकाचे राजकीय सल्लागार, प्रतापगढ संस्थानचे पोलीस सुपरिंटेंडन्ट आणि न्यायाधीश, ग्वाल्हेर शिक्षण खात्यात रजिस्ट्रार अशा जबाबदारीच्या व महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय कौशल्य व कार्यक्षमतेने ते एक कुशल व कणखर अधिकारी म्हणूनही ओळखले जात. काव्यास विशेष अनुकूल नसणार्या व्यवसायांतही तांबे यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाने त्यांचा राजकवी म्हणून बहुमान केला. त्यांचा कार्यकाळ मध्य प्रदेशातच गेल्यामुळे तिथल्या राज्य शासनातर्फे आजही त्यांच्या नावे विविध पुरस्कार, सन्मान दिले जातात. शिवाय ग्वाल्हेरसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये तांबे प्रेमी अभ्यास मंडळे कार्यरत आहेत.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्यात मध्य प्रदेशाप्रमाणेच काही उपक्रम हाती घेता यावे अशा हेतूने सुरुवात म्हणून कविवर्य भा. रा. तांबे यांच्या १५१ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुणे आणि मुंबईचे रहिवासी असलेल्या तांबे कुटुंबीयांतर्फे येत्या १० जानेवारी रोजी पुण्यातल्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात संध्याकाळी ४:३० ते ८:०० या वेळेत ‘मधु मागसि माझ्या’ हा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम तीन भागात होणार आहे. प्रारंभी तांब्यांचे हस्तलिखित, त्यांना मिळालेला राजकवी पुरस्कार तसेच निवडक मानपत्रें आणि तत्कालीन छायाचित्रांचे छोटेसे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन होईल. याप्रसंगी प्रसिद्ध कवियित्री व समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहतील. ज्येष्ठ भावकवी आणि संत साहित्यिक श्री. वि. ग. सातपुते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर तिसऱ्या भागात सृजनस्नेही पुणे निर्मित आणि सुधीर मोघे प्रस्तुत ‘स्मरण राजकवींचे’ हा भा. रा. तांबे यांच्या निवडक काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन नीरजा आपटे या करतील. या कार्यक्रमासाठी साहित्य, संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत आहे.
