प्रतिथयश कलाकारांसोबतच नवोदित आश्वासक कलाकारांच्या सादरीकरणाने रंगला तालचक्र युवा महोत्सव
पुणे : भावपूर्ण गायकी आणि वादनाच्या अभूतपूर्व सादरीकरणाने दोन दिवसीय तालचक्र युवा महोत्सवाचा नुकताच समारोप झाला. प्रतिथयश कलाकारांच्या दमदार सादरीकरणासोबतच नवोदित कलाकारांचे आश्वासक सादरीकरण हे यावर्षीच्या युवा महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
तालवाद्य व वादक यांना केंद्रस्थानी ठेऊन सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या वतीने दरवर्षी तालचक्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. गेले काही वर्षे खास आश्वासक युवा कलाकारांसाठी तालचक्र युवा महोत्सव आयोजित केला जातो आहे. या वर्षी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेचे सभागृह आणि जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सव संपन्न झाला.

पद्मश्री पं. विजय घाटे यांसोबतच प्रवीण मसालेवालेचे राजकुमार चोरडिया, विशाल चोरडिया, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, पुनीत बालन, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, नेचर मुकईवाडीचे पवन पुजारी, ममता घाटे, माजी खासदार वंदना चव्हाण, सिम्बायोसिसच्या विद्या येरवडेकर, तबलावादक शंकर कुचेकर, जितो पुणेचे इंदर छाजेड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वर्गीय उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण करून महोत्सवाला सुरवात झाली. उस्ताद झाकीर हुसैन हे शरीर रुपाने आपल्यामध्ये नसले तरी, ते प्रत्येक कलाकाराच्या मनात सदैव आहेत, अशा शब्दांत पं. विजय घाटे यांनी उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली.
तालचक्र युवा महोत्सवात शनिवार(४ जानेवारी)च्या पहिल्या सत्रामध्ये प्रसिद्ध व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य व सुपुत्र राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन रंगले. त्यांनी राग जोगमध्ये आलाप, जोड, झाला या पद्धतीने मोजक्या वेळात रागरूप उभे केले. रागाधारित फ्यूजन धून सादर होताना सर्व वाद्यांच्या सौंदर्यस्थळांचा आनंद यावेळी रसिकांना मिळाला. ‘मुझमें कही…’, ‘दो दिल धडक रहे हैं…’, ‘सुन री सखी…’, ‘ये हसी वादिया..’ आदी गीतेही राजस उपाध्ये यांनी सादर केली. त्यांना अमित कवठेकर (तबला), भूषण देशमुख (विविध तालवाद्ये), अमित गाडगीळ (बेस गिटार), अमन वरखेडकर (कीबोर्ड) यांनी वादनाची रंगत खुलवणारी साथसंगत केली.
पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये उस्ताद रशीद खाँ यांचे शिष्य नागेश आडगांवकर यांचे गायन झाले. त्यांनी पंडिता शोभा गुर्टू यांच्या रचना प्रस्तुत करून त्यांना स्वरांजली अर्पण केली. ‘बाली उमर…’, ‘आजा रे मीत पिहरवा…’, ‘छाई घटा घनघोर…’, ‘मिटकर मोहब्बत में…’, ‘गर्मी ए हसरतें…’ अशा शोभाताईंनी अजरामर केलेल्या अनेक उपशास्त्रीय संगीत रचना नागेश यांनी तन्मयतेने सादर केल्या. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना…’, ‘अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर…’, ‘रे नंदलाला तू छेडू नको..’ अशा मराठी रचनाही नागेश यांनी भावपूर्णतेने गायिल्या.
नागेश आडगांवकर यांना विनायक कुडाळकर (तबला), अपूर्व पेठकर (संवादिनी) व ललित सिसोदिया (सारंगी) यांनी अनुरूप साथसंगत केली. प्रफुल्ल सोनकांबळे आणि शुभम बोरकर यांनी स्वर व तानपुरा साथ केली.
आश्वासक युवा कलाकार शिव चोरडिया यांच्या तबला वादनाने तालचक्र युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरुवात झाली. दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात शिव चोरडिया यांचे एकल तबलावादन रंगले. सुरुवातीला त्यांनी अजराडा घराण्याचा कायदा सादर केला. त्यानंतर शिव यांनी रेले, पेशकार आणि काही तुकडे व चक्रदार प्रस्तुत केले. यात उस्ताद झाकीर हुसैन यांच्या एका तुकड्याचाही समावेश होता. ‘मेरे ढोलना…’ या गाण्यावर सादर केलेल्या तबला वादनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. शिव चोरडिया यांना संवादिनीवर सुधीर टेकाळे यांनी साथ केली.
या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये बासरीवादक एस. आकाश यांचे बासरी वादन आणि यशवंत वैष्णव यांचे तबलावादन रंगले. यावेळी एस. आकाश यांनी राग पुरिया प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, द्रुत एकताल, झपताल, तीनताल यांचे बहारदार सादरीकरण केले. यानंतर विनय रामदासन व अनुजा झोकरकर यांनी ‘मन मोहयो सावरो’ हा हवेली संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी ‘श्री राधे शरणम् मम…’, ‘आवत मोहन…’, ‘सोई रसना हरी गुण गावे…’ आणि ‘रासिया मृगनयनी…’ ही पदे सादर केली. यावेळी अमित पाध्ये (ऑर्गन), शुभम उगळे (पखवाज), उमेश वरभुवन (तालवाद्य), भास्कर दास (बासरी), मकरंद शर्मा (तालवाद्य), अमन रायथथा व केदार जोग (कोरस) यांनी साथसांगत केली. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर निलेश यादव यांनी साउंड इंजिनिअर म्हणून काम पाहिले.
