प्राज इंडस्ट्रीजने विकसित केलेल्या बायो बिटुमिनचा वापर करून देशातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : भारतातील अग्रगण्य औद्योगिक बायोटेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने लिग्निन-आधारित बायो-बिटुमिनचा वापर करून देशातील पहिल्या शाश्वत रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच या रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाले. नागपूर-मानसर बायपास प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ या ठिकाणी हा रस्ता उभारण्यात आला असून यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे. यामध्ये जीवाश्म-आधारित बिटुमिनचा वापर करण्यात आला असून अशा पद्धतीने देशातील पहिल्याच महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे हे विशेष.
प्राजच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिग्निनचे बायो-बिटुमिनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यामुळे जीवाश्म-आधारित बिटुमिनच्या जागी प्राजने उद्योग विश्वाला एक शाश्वत आणि समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या हरित पर्यायाच्या वापराने जीवाश्म-आधारित बिटुमिनच्या तुलनेत हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जनात तब्बल ७० टक्के इतकी घट करणे सहज शक्य असून १५ टक्क्यांपर्यंत मिश्रण क्षमता असलेले हे हरित बांधकाम साहित्य नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकते, हेही लक्षात घ्यायला हवे.
पारंपारिक बिटुमिनमध्ये १५ टक्के मिश्रण करण्यासाठी भारताला किमान १५ लाख टन बायो-बिटुमिनची आवश्यकता असून या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण ४ हजार ते ४,५०० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करू शकू असा अंदाज आहे. असे झाल्यास शाश्वत आणि पर्यावरणपूरक रस्ते व पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या दिशेने आपण एक परिवर्तनकारी पाऊल टाकू शकू असा विश्वास यावेळी प्राजच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) व सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआरआय) यांच्या सहकार्याने व प्राजच्या वतीने लिग्निन-आधारित बायो बिटुमिन नमुन्याची चाचणी करण्यात आली आणि १५% बिटुमिन यशस्वीरित्या बदलण्यात यश देखील आले. याबरोबरच लिग्निन बायो बिटुमिनचा वापर करून गुजरातमधील हलोल येथे प्राजच्या वतीने सर्व्हिस रस्ताही तयार करण्यात आला. २ वर्षे आणि ३ पावसाळी ऋतू असा प्रदीर्घ काळ याचे निरीक्षण केल्यानंतर सीएसआयआर-सीआरआरआयने या रस्त्याचे परीक्षण केले व समाधानकारक परिणाम मिळाल्याचे नोंदवले. शिवाय रस्त्याच्या गुणवत्तेत कोणतीही आक्षेप घेण्यासारखी चिन्हे आढळली नाहीत. ही यशस्वी चाचणी नागपूर-मानसर प्रकल्पाच्या उभारणीत एक महत्त्वाचा घटक ठरला.
या यशाबद्दल बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “लिग्निन-आधारित बायो-बिटुमिनचा वापर करून भारतातील पहिल्या शाश्वत रस्त्याचे उद्घाटन होणे, हा प्राज इंडस्ट्रीजसाठी अभिमानाचा क्षण आहे असे मी म्हणेल. स्वयंपूर्ण अशा हरीत आणि शाश्वत भविष्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा हा एक मह्त्त्वाचा पुरावा आहे असे मला वाटते. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले हे अभिनव बायो-बिटुमिन हे जीवाश्म-आधारित बिटुमिनला समर्थ पर्याय म्हणून काम करेलच त्यासोबत आपले परकीय चलन वाचविण्यास देखील मदत करेल. आपल्या देशाची आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल याद्वारे अधिक सुकर होईल.”
शाश्वत विकासाप्रती कटीबद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याबद्दल याप्रसंगी विशेष आभार मानतो असे सांगत डॉ. चौधरी पुढे म्हणाले, “विकसित भारत २०४७ च्या दिशेने मार्गक्रमणा करीत असताना लिग्निनवर आधारित बायो बिटूमनसारखे औद्योगिक जैवतंत्रज्ञानाचे पर्याय हे शाश्वत विकास आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यात कसे हातभार लावू शकते याचे एक उत्तम उदाहरण प्रस्तुत करेल. पर्यावरण पूरक संशोधन व विकासाला चालना देवून प्राज कायम राष्ट्रबांधणीच्या कामात आपले योगदान देण्यास सज्ज आहे, याची खात्री आम्ही यानिमित्ताने देऊ इच्छितो.”
बिटुमिन हे कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण असून रस्ते बांधणीत महत्त्वपूर्ण बाइंडर म्हणून ते परिणामकारकपणे कार्य करते. मात्र विकसित भारत २०४७ चे ध्येय साध्य करीत असताना या उत्पादनाचा वापर वाढविण्यासोबतच भविष्यातील मागणीसाठी शाश्वत उपाय योजणे हे आपल्यासाठी देखील आवश्यक आहे. तेल मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२३- २४ साली भारताचा बिटुमिनचा वापर हा ८८ लाख टन होता मात्र आता २०२४– २५ मध्ये तो १०० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. यातील ५० टक्के बिटुमिन आयात केले जाते, त्यामुळे देशाला वार्षिक २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा आयात खर्च येतो याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे.
