नजाकतदार बासरीवादन आणि कौशिकी चक्रवर्ती यांचा गुंजन करणारा बिहाग
पुणे : बासरीवादक राकेश चौरसिया यांचे नजाकतदार बासरीवादन आणि कौशिकी चक्रवर्ती यांचा गुंजन करणारा ‘बिहाग’ यांची प्रसन्न छाया ‘सवाई’ च्या चौथ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रावर पसरली होती. त्याने रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
सवाईच्या चौथ्या दिवसाचा उत्तरार्ध सुरू झाला, तो रसिकांच्या आवडत्या बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या नजाकतदार वादनाने. राकेश यांनी वेळेनुसार राग जोग मधील आलापी हळुवारपणे सुरू करताच, रसिकांमध्ये आनंदाची लहर पसरली. सर्वप्रथम राग जोग मध्ये आलाप, जोड, झाला पद्धतीने हा राग त्यांनी सादर केला. वादनातील प्रत्येक स्वरसंगतीमधून माधुर्याचा प्रत्यय रसिकांना मिळत होता. प्रारंभी अनिबद्ध आलापीतून या रागाचे सुरेख दर्शन राकेश यांनी घडवले. नंतरच्या तंत अंगाने जाणाऱ्या वेगवान तानांना रसिकानी उत्स्फूर्त दाद दिली. तबल्याच्या साथीने सवाल जवाबातून लयीवरील प्रभुत्व त्यांनी दाखवून दिले. मत्त तालात गत सादर करून शेवटी हंसध्वनी रागातील विविध सुरेख कलात्मक तानांनी राकेश यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
शेवटी रसिकांच्या आग्रहास्तव पहाडी धून वाजवून त्यांनी वादनाचा समारोप केला. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी तबल्यावर वादनाची रंगत खुलवणारी साथ केली. तानपुरा साथ विनायक कोळी यांनी केली.
रसिकांना ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असते, त्या लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती आपले सुपुत्र रिषित देसिकन यांच्यासह स्वरमंचावर दाखल होताच, टाळ्यांचा गजर झाला. आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने गायनाचा रंग अधिकच खुलवणाऱ्या कौशिकी यांनी रसिकांना विनम्र अभिवादन करत रसिकांचे आशीर्वाद मागितले आणि राग बिहाग ने गायनाला सुरवात केली.
‘कान मो करनफूल…’ ही विलंबित एकतालातील बंदिश त्यांनी सादर केली. पतियाळा घराण्याचे दर्शन घडवत, मोजक्या आलापांतून राग बिहाग उभा करत त्यांनी प्रसन्न वातावरण निर्मिती केली. त्यांचे पुत्र रिषित यांनीही काही आलाप घेत साथ केली. पाठोपाठ द्रुत लयीतील लयकारीने कौशिकी यांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक समेला रसिक टाळ्यांनी दाद देत होते. रसिकांच्या आग्रहाला मान देत कौशिकी यांनी मिश्र पिलू मधील दादरा पेश केला. त्यातील आर्तता विलक्षण होती. ईशस्तुतीपर श्लोकाने कौशिकी यांनी गायनाची सांगता केली.
‘सवाई’ चा स्वरमंच सदैव वंदनीय आहे. रसिकांचे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मला मिळत आले आहेत. यापुढेही ते सतत मिळत राहावेत, हीच प्रार्थना आहे. रसिकांचे हसरे चेहरे मला नेहमी विश्वास देतात. घराण्यात जेव्हा परंपरा, वारसा असतो, तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढते. या स्वरमंचावर त्या जबाबदारीची जाणीव अधिक गहिरी होते, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांना सत्यजीत तळवलकर (तबला), मुराद अली खाँ (सारंगी), तन्मय देवचके (हार्मोनियम), वैशाली कुबेर व अनुश्री क्षीरसागर यांनी तानपुरा साथ केली.
