Monday, June 8, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

संसदेत सत्ताधारी आणि विरोधी खासदार एकमेकांना भिडले

मुंबई: प्रतिनिधी

आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आल्याचे विदारक चित्र दिसून आले. खुद्द लोकशाहीचे मंदिर मानले गेलेल्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी खासदार एकमेकांना भिडले. या राड्यात दोन सत्ताधारी खासदार जखमी असून त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी धक्काबुक्की केल्याचा आरोप खुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. 

घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कालच्या प्रमाणेच आजच्या दिवशीही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांकडून देखील आपण नव्हे तर काँग्रेस डॉक्टर आंबेडकर यांचा अवमान करीत असल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण वादावादी आणि घोषणाबाजीपुरते मर्यादित न राहता दोन्हीकडचे खासदार एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे नागालँड च महिला खासदार फांगनोन कोन्याक यांनी खुद्द विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी सत्ताधारी पक्षाकडून संसद मार्ग पोलीस ठाण्यात देखील तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

दुसरीकडे मुंबई येथे काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांना दाद न देता कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी लाठीमार केला. या प्रकरणांनी दिल्ली आणि मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading