Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कार्यकर्त्यांमधील संतापाच्या नावाखाली जोडे मारो आंदोलनासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत -अमोल मिटकरी

नागपूर:  छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी स्वतः अजित पवार हेच दूर करतील. मात्र, कार्यकर्त्यांमधील संतापाच्या नावाखाली जोडे मारो आंदोलनासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. उद्दामपणा सहन केला जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवृत्ती अमोल मिटकरी यांनी दिला आहे. 

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे ते सध्या नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे त्यांनी वेगळी वाट पकडण्याचे सूचित केले आहे. कोण दादा, कसला वादा, असे उद्गार देखील त्यांनी काढले आहेत. काही ठिकाणी भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांकडून संतप्त आंदोलनेही केली जात आहेत. त्या अनुषंगाने मिटकरी यांनी हा इशारा दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही नेते नाराज भुजबळ यांना भेटले असल्याबद्दल विचारले असता मिटकरी म्हणाले की, भुजबळ हे जसे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत तसेच ते दीर्घकाळ इतर मागासवर्गीय यांचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात त्यांना कोणीही भेटू शकते. 

सत्तेपासून दूर असलेल्यांमध्ये अस्वस्थता 

शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा घडू लागल्या आहेत.  या भेटीबद्दल बोलताना मिटकरी म्हणाले की, अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. आमचा पक्ष सत्तेत आहे. मात्र, सत्तेपासून दूर असलेल्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. या अस्वस्थतेतूनच शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली असावी. त्यांच्यासारखा नेता अजित पवार यांची सहज सदिच्छा भेट घेण्याची शक्यता नाही, असेही मिटकरी म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading