कवितेकडे कविता म्हणून पाहिले पाहिजे: प्रवीण दवणे
पुणे : जुने चष्मे नव्या काळात उपयोगी पडत नाहीत. स्त्रियांची कविता आणि पुरुषांची कविता असा भेद न करता कवितेकडे कविता म्हणून पाहिले पाहिजे. असे मत ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा ‘सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कवयित्री डॉ. पद्मरेखा धनकर आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी यांना प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी आमदार अनंत गाडगीळ आदी उपस्थित होते.
दवणे म्हणाले, धनकर आणि माळी यांच्या कविता आत्मसंवादी आहेत. धनकर म्हणाल्या, केवळ टाळ्या ही चांगल्या कवितेची पावती असू शकत नाही. चांगली कविता मनात रेंगाळत राहते. माळी म्हणाल्या, कविता आणि अभिनय ही दोन टोके आहेत. अभिनय करताना मुखवटे धारण करावे लागतात. कविता स्वतःशी प्रामाणिक राहून लिहावी लागते.
प्रा. जोशी म्हणाले, “राजकारणात हायकमांडचे ऐकावे लागते. नाट्य-चित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मत विचारात घ्यावे लागते. कवीचे तसे नसते. कवितेवर कवीची सार्वभौम सत्ता असते. अंतःस्वर जपल्याशिवाय कसदार कविता निर्माण होत नाही.धनकर यांची कविता वर्तमानातील अस्वस्थायन मांडणारी आहे. ग्लामरच्या विश्वात राहूनही प्राजक्ता माळी यांना कवितेचे बोट धरावेसे वाटते, ही महत्त्वाची गोष्ट आहे. जीवन व्यवहार आणि कला व्यवहाराच्या घुसमटीत अनेक कलावंतांचे आयुष्य गुदमरून जाते असे घडू नये, यासाठी जाणीवेचा स्तर उंचावणे महत्त्वाचे आहे, याचे भान असणारी प्राजक्ता यांची कविता आहे.” पुरस्कारामागील भूमिका विशद करताना अनंत गाडगीळ म्हणाले, “मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात तसेच घरातील एखादी व्यक्ती प्रतिभासंपन्न आणि प्रसिद्ध असेल, तर तिच्या तेजामागे इतर व्यक्तींचे तेज लुप्त होते. माझी आईदेखील अतिशय प्रतिभासंपन्न होती, पण तिचे कर्तृत्व पुढे आले नाही. त्यामुळे तिच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे.” सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
