NIA ची अमरावती, भिवंडीसह 19 ठिकाणी कारवाई
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अमरावती आणि भिवंडी येथे धाड टाकून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोन तरुणांना अटक केली आहे. महाराष्ट्राबरोबरच जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश व अन्य राज्यात एनआयएच्या तब्बल 19 ठिकाणी धाडी पडल्या असून देशभरातील दहशतवादी संघटनांच्या भोवती तपास यंत्रणाचा फास आवळला जात आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी रात्री बारा वाजता अमरावती येथील छाया नगर येथे छापा टाकून पस्तीस वर्षीय तरुणाला अटक केली. हा तरुण पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात या तरुणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय तपास यंत्रणेने भिवंडीजवळ खोणी खाडीपार या गावात धाड टाकून कामरान अन्सारी या 45 वर्षीय संशयिताला अटक केली. अन्सारी हा देखील पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. भिवंडी परिसरात वर्षभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही तिसरी कारवाई केली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात काही काळापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन तरुणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने भिवंडी जवळच्या पडघा या गावात धाड टाकून तब्बल आठ जणांना अटक केली. पडघा या गावात दहशतवादी शक्तींनी समांतर यंत्रणा स्थापन केली असून संपूर्ण गाव दहशतवादी शक्तींच्या प्रभावाखाली असल्याचे यावेळी दिसून आले होते.
