मराठी चित्रपटांनी ‘ब्लॉकबस्टर’चे ध्येय ठेवावे – महेश मांजरेकर
पुणे : देशातील इतर कुठल्याही चित्रपटसृष्टीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टी अधिक संघटित आणि सुव्यवस्थित आहे. त्यामुळे बदलत्या काळात मराठी चित्रपटांनी तीन कोटींमध्येच अनेक चित्रपट करण्यापेक्षा, मोठ्या बजेटच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांचे ध्येय ठेवावे, असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी दिला.
माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी राहुल रंजन महिवाल व अस्लम हसन, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी व कवी राहुल रंजन महिवाल यांच्या ‘जश्न ए दिवानगी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
मध्यमवर्गीय घरातले बालपण, मराठमोठे संस्कार असल्याने चित्रपट, नाटकाचे कुठलेही वातावरण घरात नव्हते, पण जवळ राहणाऱ्या जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्यामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टीशी परिचय झाला, वाढत गेला. नंतर नाटकाची कार्यशाळा केली आणि मग चित्रपटसृष्टीत रमत गेलो, असा प्रवास उलगडताना मांजरेकर यांनी अभिनेता संजय दत्तसोबत काम करतानाचे अनुभव सांगितले.
दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीविषयी अनेक मिथके पसरली आहेत. मी तिथे सातत्याने काम केले आहे, करत आहे. ते व्यावसायिक जरूर आहेत, पण मराठीमध्ये आशयाची समृद्धी सर्वाधिक आहे. रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट आहे. मात्र, ३ कोटी रुपयांत चित्रपट हा प्रकार मराठी निर्मात्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि किमान ५० कोटींच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटाचे स्वप्न पाहून ते साकारले पाहिजे. मराठी चित्रपट देशभर प्रदर्शित केला पाहिजे आणि प्रमोशनसाठी मोठे बजेट ठेवले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन मांजरेकरांनी केले.
मी सुरुवातीला ‘निदान’ हा चित्रपट केला होती, ज्यामध्ये एड्सग्रस्त मुलीची गोष्ट होती. त्यानंतर ‘वास्तव’ केला. ‘अस्तित्व’चे कथानक मला माझ्या आईकडे पाहून सुचले. लग्न झाल्यावर स्त्रीच्या नावासकट बरेच काही बदलते. मग तिचे नेमके ‘अस्तित्व’ काय, या प्रश्नाने मला अस्वस्थ केले, असे मांजरेकर म्हणाले.
मी एक हट्टी दिग्दर्शक आहे, असे सांगून मांजरेकर म्हणाले, “चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि या निर्मितीचा सूर दिग्दर्शकाने ठरवायचा असतो असे मी मानतो. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे हा विलक्षण आनंद होता.”
तत्पूर्वी डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या पूर्वार्धात बोलताना माजी संमेलनाध्यक्ष आणि लेखक लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “बहुभाषिकता हे आपल्या देशाचे वैभव आहे, ते आनंदाने मिरवले पाहिजे. आपल्या बहुभाषिकतेला बहुसांस्कृतिकता आणि बहुधार्मिकतेचे आयाम आहेत. सहिष्णुता ही आपली ओळख आहे. मानवतावादी भूमिका, हे आपले वैशिष्ट्य आहे. आपल्या प्रत्येक भाषेला मोठी साहित्यिक परंपरा आहे. सर्व भाषांमध्ये भगिनीभाव आहे. त्यामुळे एक देश, एक भाषा, हे योग्य नाही.”
साहित्य मानवी सुख-दुःखाचे, वेदनांचे, सोसण्याचे दर्शन घडवते. धर्म, राजकीय आणि अर्थसत्ता, यामुळे समाजात दुःख निर्माण होतात. अशा मानवी दुःखाचा अन्वयार्थ साहित्य शोधते, त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी वाचनसंस्कृती जोपासली पाहिजे. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाषांमधील सेतू जोडण्याचे आणि साहित्यसंवर्धनाचे कार्य होत आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
मोनिका सिंग स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाल्या, “डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलने अल्पावधीत साहित्यप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले आहे. हा साहित्य महोत्सव अधिकाधिक आशयसंपन्न करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. महोत्सवात अधिकाधिक भाषांचे प्रतिनिधित्व असावे, असाही प्रयत्न आहे. यातून लेखक आणि वाचकांमध्ये नाते जोडण्याचा आमचा उद्देश आहे.”
शाहीर सुरेश वैराळकर म्हणाले, “कोणतीही कलात्मक निर्मिती आस्वादकाच्या प्रतीक्षेत असते. या महोत्सवाच्या निमित्ताने कलात्मक निर्मितीला आस्वादक भेटतात, हे महोत्सवाचे श्रेय आहे. मंचीय पद्धतीने सादर होणारी कविता दर्जात कुठेही कमी नाही.”
कवी अस्लम हसन यांनी ‘जश्न ए दिवानगी’ हा कवितासंग्रह म्हणजे जीवनाचा उत्सव असल्याचे मत मांडले. प्रशासकीय अधिकारी संवेदनशील असेल तर जीवनाचे सारे रंग कसे व्यक्त होतात, ते या संग्रहातून दिसते, असे ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
