Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘ॲक्टिव्हिझम’चा खरा अर्थ उमगलेले कलाकार यशस्वी होतात

कर्नाटकातील नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघाचे प्रमुख के. व्ही. अक्षरा यांचे प्रतिपादन
पुणे  : आपण ‘ॲक्टिव्हिझम’ या शब्दाचा अर्थ निषेध, मागण्या, बदल, न्याय असा काहीसा मर्यादित घेतो. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत नाटक करणे, प्रचलित व्यवस्थेवर टीका करणारे नाटक, हेच या प्रकारात मोजले जाते. पण आजघडीला रंगभूमीवरील ‘ॲक्टिव्हिझम’चा अर्थ याहून व्यापक आहे. प्रत्येक संदर्भानुसार, प्रत्येक प्रदेश आणि तेथील इतिहास, संस्कृती यानुसार हा अर्थ बदलत जातो. ज्या कलाकारांना आपापल्या संदर्भात हा अर्थ उमगला, तेच यशस्वी झाले असल्याचे मत कर्नाटकातील नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघाचे प्रमुख के. व्ही. अक्षरा यांनी व्यक्त केले. रुपवेध प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२४’ च्या कार्यक्रमात बीजभाषण करताना ते बोलत होते.

टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात यावर्षी कर्नाटकातील यक्षगान कलाकार गणेश मंदार्थी आणि पश्चिम बंगालमधील ‘अमता परिचय’ या थिएटर ग्रुपच्या सह-संस्थापिका, प्रसिद्ध नाट्य-दूरचित्रवाणी कलाकार ऋतुपर्णा बिश्बास यांना के. व्ही अक्षरा यांच्या हस्ते ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२४’ ने सन्मानितही करण्यात आले.

सदर कार्यक्रमादरम्यान के. व्ही. अक्षरा यांचे ‘एक्स्पांडिंग द नोशन्स ऑफ ऍक्टिव्हिझम इन थिएटर’ या विषयावर बीजभाषण संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रुपवेध प्रतिष्ठानचे आनंद लागू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना के. अक्षरा म्हणाले, ‘‘एखाद्या उद्देशासाठी नाटक करणे, म्हणजेच ‘ॲक्टिव्हिझम’ नव्हे. केवळ नाटक करत राहणे, हा देखील एक प्रकारचा ‘ॲक्टिव्हिझम’च आहे. आठवड्यातील पाच दिवस काम करून नाटक करता येत नाही. नाटक ही २४ तास करण्याची गोष्ट आहे. याच कारणामुळे देशातील विद्यापीठे आणि नाट्यशास्त्राचे विभाग श्रेष्ठ रंगकर्मी घडवू शकले नाहीत, असे माझे मत आहे. साक्षरता म्हणजे केवळ भाषा अवगत करणे नाही. नृत्य करता येणे, चित्र काढता येणे, ही देखील साक्षरताच आहे. अशा प्रकारची साक्षरता समाजात रुजवण्यासाठी रंगकर्मींना भविष्यात काम करावे लागेल.’’

पुरस्काराला उत्तर देताना ऋतुपर्णा बिश्बास म्हणाल्या, ‘‘मी नाटकात अजिबात काम करणार नाही, असे लहान असताना नेहमी आई-बाबांना सांगत असे. पण नंतर नाटकातच आले आणि येथेच सगळे काम केले. ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर आनंद झाला. हा पुरस्कार भविष्यातील कामांसाठी बळ देत राहील.’’

‘‘लहान वयातच माझ्या आई-वडिलांचे निधन झाले. माझे वडील एका जातीचे, आई अन्य जातीची आणि ज्यांनी मला लहानाचे मोठे केले, ते देखील वेगळ्या जातीचे. त्यामुळे या अर्थाने मी ‘कास्टलेस’ व्यक्ती आहे. हा केवळ पुरस्कार नाही, तर ही एक जबाबदारी आहे, अशी माझी भावना असल्याचे मनोगत गणेश मंदार्थी यांनी व्यक्त केले.

आज नाटक करणे हेच मोठे आव्हान आहे असे सांगत डॉ मोहन आगाशे म्हणाले, “चित्रपट, टीव्ही आला आता व्हर्च्युअल जगाच्या कक्षा आणखी रुंदावत असताना रंगभूमी हे असे माध्यम आहे ज्यामुळे संवाद टिकून आहे. रंगभूमी भविष्यात जिवंत रहायला हवी, जगायला हवी असे वाटते. रंगभूमी ही चैन नाही तर मानवी गरज आहे हे ही आपण लक्षात घ्यायला हवे.”

श्रीराम लागू रंग अवकाशच्या माध्यमातून जिवंत रंगभूमी अनुभविता येत आहे, यासोबतच नाट्यकर्मी व प्रेक्षक यांमध्ये संवाद होत आहे ही महत्त्वाची बाब असल्याचे आनंद लागू यांनी नमूद केले. अर्णव वारियार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शुभांगी दामले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading