सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास इंद्रधनुष्य स्पर्धेत नृत्य विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद
पुणे : दिनांक ७ ते ११ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत राज्यपाल कार्यालयाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी राज्यस्तरीय इंद्रधनुष्य या सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील २४ विद्यापीठे सहभागी झाली होती. संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललित कला या प्रमुख ५ कला विभागातील एकूण २९ कलाप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लोकनृत्य या कला प्रकारात पहिलं पारितोषिक प्राप्त करत नृत्य विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. याबरोबरच संगीत विभागत नाट्यगीत प्रथम, सुगम गायन द्वितीय, पाश्चात्य समूह गायन द्वितीय, लोकवाद्यवृंद द्वितीय, ललित कला विभागात रांगोळी प्रथम, कोलाज तृतीय, भित्तीचित्र तृतीय, मातीकाम तृतीय, शॉर्ट फिल्म तृतीय, नाट्य विभागात एकांकिका तृतीय अशी एकूण १२ पारितोषिक विद्यापीठाने पटकावली.
विद्यापीठाने प्राप्त केलेले हे यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट यामुळे या स्पर्धेत आपण यशस्वी होऊ शकलो. याकरिता स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून कौतुक करतो. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व दिग्दर्शक आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांचे अभिनंदन करतो. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरु डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले.
