मेव्हिरिक्स संघाची रिक्रिएशन संघावर मात
: हर्षल हडके सामनावीर
पुणे – मेव्हिरिक्स अकादमी संघाने रिक्रिएशन क्लब संघावर ४० धावांनी मात करताना, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत विजयाची नोंद केली.
शिंदे हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेव्हिरिक्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०० धावापर्यंत मजल मारली. सलामीवीर हर्षल हडकेने ६४ चेंडूत ६ चौकार व ७ षटकार लगावताना नाबाद ९९ धावांची खेळी केली. त्याला शुभम तैस्वालने ४६ (२ चौकार, ५ षटकार) धावा करताना सुरेख साथ दिली. अनिश गायकवाडने १६, यशराज खाडेने १४ तर अथर्व काळेने नाबाद १७ धावांचे योगदान दिले. शुभम शिंदे, आदिनाथ गायकवाड व साहिल कड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
विजयासाठी आवश्यक असणाऱ्या २०१ धावांचा पाठलाग करताना रिक्रिएशन संघाचा डाव निर्धारित २० षटकांत ९ बाद १६० धावांमध्ये मर्यादित राहिला. अनोष भोसलेने सर्वाधिक ३८ (२ चौकार, २ षटकार) धावांची खेळी केली. त्याला आदिनाथ गायकवाडने नाबाद २६ (३ चौकार, १ षटकार), धीरज फटांगरेने २५ (२ चौकार, २ षटकार), धावांचे योगदान दिले. मयांक कश्यपने ३, ओंकार गुंजाळ व अक्षय वायकर यांनी प्रत्येकी २ तर गौरव कुमकर व शुभम तैस्वाल यांनी प्रत्येक १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : मेव्हिरिक्स अकादमी : २० षटकांत ३ बाद २०० : हर्षल हडके नाबाद ९९ (६ चौकार, ७ षटकार), शुभम तैस्वाल ४६ (२ चौकार, ५ षटकार), अनिश गायकवाड १६ (२ चौकार, १ षटकार), यशराज खाडे १४ (१ चौकार, १ षटकार), अथर्व काळे १७ (१ चौकार, १ षटकार) वि. वि. रिक्रिएशन २० षटकांत ९ बाद १६० : अनोष भोसले ३८ (२ चौकार, २ षटकार), आदिनाथ गायकवाड नाबाद २६ (३ चौकार, १ षटकार), धीरज फटांगरे २५ (२ चौकार, २ षटकार), मयांक कश्यप ३-२१, ओंकार गुंजाळ २-२२, अक्षय वायकर २-३०, गौरव कुमकर १-१९, शुभम तैस्वाल १-१७. सामनावीर : हर्षल हडके.
