Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

160 जागांवर महायुती विजय मिळवेल, संघाचे सर्वेक्षण

मुंबई:  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून महायुती राज्यात पुन्हा सत्ता हस्तगत करेल, असा दावा सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभरात केलेल्या सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेचे 288 मतदारसंघ असून त्यापैकी 160 जागांवर महायुती विजय मिळवेल, असे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आल्याचे संघाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह विविध स्तरावरील अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपेक्षा करणारी वक्तव्य जाहीरपणे केली होती. त्यामुळे त्या निवडणुकीत संघाने तटस्थ भूमिका स्वीकारली. त्याचा परिणाम म्हणून देशभरात भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी खालावली. त्यानंतर मात्र भाजपने संघाशी जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. अर्थातच राज्यातील विधानसभा निवडणुकीत संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक कार्यरत झाले आहेत. 

कोणत्याही निवडणुकीच्या वेळी राजकीय परिस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी संघाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात अंतर्गत सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या अहवालावरून भाजपची निवडणुकीसाठीची रणनीती ठरविण्यात येते. या विधानसभा निवडणुकीसाठीही संघाकडून हेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. 

त्यानुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी संघाने सर्व 288 मतदार संघात सर्वेक्षण केले आहे. या निवडणुकीत महायुतीला 160 जागांवर विजय मिळेल, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. भाजपाला 90 ते 95, शिवसेना शिंदे गटाला 40 ते 50 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 25 ते 30 जागांवर विजय मिळेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading