बायोडिग्रेडेबल व कंपोस्टेबल असे बायोप्लॅस्टिक विकसित करण्यात पुण्यातील ‘प्राज’ला यश
प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बायोपॉलिमरसाठीच्या भारतातील पहिल्या व एकमेव प्रात्यक्षिक सुविधेचे (डेमोस्ट्रेशन फॅसिलिटी) केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र भार) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले उद्घाटन
पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या व जगातील विविध देशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार असलेल्या प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने बायोपॉलिमरसाठीच्या भारतातील पहिल्या व एकमेव अशा प्रात्यक्षिक सुविधेचे (डेमोस्ट्रेशन फॅसिलिटी) उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या सुविधेमध्ये प्राजच्या वतीने पूर्णत: स्वदेशी व एकात्मिक (इंटीग्रेटेड) तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या पॉलिलॅक्टिक ऍसिड तंत्रज्ञानाद्वारे बायोडिग्रेडेबल व कंपोस्टेबल अशा बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्यात येणारअसल्याची माहिती प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राजचे अतुल मुळे आणि अश्विनी शेटे हे देखील उपस्थित होते.
पुण्याजवळील जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र भार) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. केंद्र सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाचे सचिव डॉ राजेश गोखले, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ आशिष लेले आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
औद्योगिक जैवतंत्रज्ञानात अग्रणी संस्था म्हणून काम करीत असताना चक्रीय अर्थव्यवस्था व जैव-आधारित उत्पादनांकडे असलेला जागतिक रोख ओळखून प्राज इंडस्ट्रीजने नजीकच्या काळातील बायोरिफायनरीजचे महत्त्व ओळखले. याबरोबरच जैव गतीशीलतेसोबतच जैवइंधन उद्योगात आपले नेतृत्वही प्रस्थापित केले. या कौशल्य व अनुभवाच्या जोरावर प्राजने आपल्या बायो-प्रिझम पोर्टफोलिओद्वारे रिन्युएबल केमिकल्स आणि मटेरिअल्स (आरसीएम) मध्ये धोरणात्मकदृष्ट्या विविधता आणली. तेव्हापासून आजवर प्राजने आपल्या प्राज मट्रिक्स संशोधन व विकास केंद्रात बायोप्लॅस्टिकला महत्त्व देत पॉलिलॅक्टिक ऍसिड (पीएलए) तंत्रज्ञान विकसित करण्यावर कायमच भर दिला.
प्राजच्या वतीने जेजुरी येथे नुकत्याच उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक प्रात्यक्षिक सुविधेमध्ये पॉलिलॅक्टिक ऍसिड हा पहिलाच विभाग असून याशिवाय फर्मेंटेशन, केमिकल सिंथेसिस, सेपरेशन व प्युरीफिकेशन यांसारखे इतर सहायक विभागही उभारण्यात आले आहेत. एकूण ३ एकर परिसरात ही सुविधा पसरलेली असून यामध्ये प्रतीवर्ष १०० टन लॅक्टिक ऍसिड, ६० टन लॅक्टाईड, आणि समतुल्य प्रमाणात ५५ टन पॉलिलॅक्टिक ऍसिडचे उत्पादन घेणे शक्य आहे.
‘केमिकल्स इन प्लॅस्टिक्स, २०२३’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) अहवालानुसार, मायक्रोप्लॅस्टिक्स आणि नॅनोप्लॅस्टिक्स सारख्या प्लॅस्टिकच्या विघटनाच्या उत्पादनांव्यतिरिक्त, दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक उत्पादनांमधून ३२०० हून अधिक हानिकारक प्लॅस्टिक मोनोमर्स आणि ॲडिटिव्ह्ज बाहेर पडतात. यामुळे कर्करोग, श्वसनाचे विकार, हार्मोनल व्यत्यय आणि वंध्यत्वाच्या समस्यांसारखे आरोग्याचे धोके निर्माण होतात. सिंगल-यूज प्लॅस्टिक (एसयूपी) उत्पादनांच्या संचयामुळे सागरी परिसंस्थांचाही श्वास गुदमरतो आणि वन्यजीवांना धोका निर्माण होतो. म्हणूनच नैसर्गिक मोनोमर्सपासून बनलेले जैव-आधारित प्लॅस्टिक हे बायोडिग्रेडेबल, सुरक्षित असतात आणि प्लॅस्टिकचे धोके कमी करण्यासाठी देखील प्रभावी उपाय ठरतात. पॉलिलॅक्टिक ऍसिड हे शर्करा, स्टार्च आणि सेल्युलोज यांसारख्या अक्षय संसाधनांपासून बनवले जात असल्याने ते जैवविघटनशील असून त्यामुळे कचरा निर्मिती आणि प्रदूषणही कमी होते. या सर्व बाबी लक्षात घेत पॉलिलॅक्टिक ऍसिडचेची कार्यक्षमता व प्रक्रियाक्षमता ही अन्न, वैयक्तिक काळजी, कृषी, फार्मा इत्यादी क्षेत्रांमध्ये महत्त्वाची ठरेल.
भारतातील बायोपॉलिमर्ससाठी ‘प्राज’ने निर्माण केलेली ही पहिलीच प्रात्यक्षिक सुविधा पॉलिलॅक्टिक ऍसिड उत्पादनासाठी स्वदेशी एकात्मिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा अग्रगण्य प्रयत्न आहे, असे सांगत सुविधेचे उद्घाटन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, “जीवाश्म-आधारित प्लॅस्टिकपासून पर्यावरणास अनुकूल पर्यायांमध्ये संक्रमण करण्याचे भारताचे दृढ प्रयत्न या तंत्रज्ञानाच्या नवकल्पनेतून आपण पाहतो आहोत असे मला वाटते. जागतिक पातळीवर प्लॅस्टिक प्रदुषणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिवाय या संशोधनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन इंडिया’ ही दोन्ही उद्दिष्टे सक्षमपणे पूर्ण होत असून ही सुविधा भारताच्या जैव अर्थव्यवस्थेच्या नवीन अध्यायाचे प्रतीक आहे.”
‘हरित भविष्यासाठी प्राज इंडस्ट्रीज’ असे गौरवोद्गार काढत डॉ. राजेश गोखले यांनी भारतातील बायोपॉलिमर्ससाठी उभारण्यात आलेल्या या पहिल्याच प्रात्यक्षिक सुविधेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘प्राज’चे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, “प्राजच्या वतीने उभारण्यात आलेली ही सुविधा बायो तंत्रज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बायो- ई ३ धोरण (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैवतंत्रज्ञान), आणि बायो- राईड योजना (जैवतंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता विकास) यांना पूरक अशी आहे. यामुळे डॉ. प्रमोद चौधरी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताला बायोप्लॅस्टिक्सचे जागतिक जैवउत्पादन केंद्र बनण्यास नक्कीच होईल असा माझा विश्वास आहे.”
भारतात दरवर्षी सुमारे २५ दशलक्ष टन प्लॅस्टिकचे उत्पादन होते. त्यातील ९.३ दशलक्ष टन इतका कचरा होतो. यापैकी केवळ ३.४ दशलक्ष टन कचरा गोळा करण्यात यश येते. बाकीचा भाग कचरा डेपो आणि महासागरांमध्ये गाडला जातो. त्यामुळे बायोडिग्रेडेबल आणि कंपोस्टेबल बायोप्लॅस्टिक्सकडे वळत प्लॅस्टिकच्या संकटाचा सामना करणे महत्त्वपूर्ण असून प्राज इंडस्ट्रीजच्या या बायोडिग्रेडेबल प्रात्यक्षिक सुविधेची उभारणी ही एक महत्त्वपूर्ण प्रगती असल्याचे डॉ आशिष लेले यांनी नमूद केले. प्लॅस्टिकच्या या तातडीच्या आव्हानाला सामोरे जात असताना उद्योग, शैक्षणिक आणि सरकार यांच्यातील सहयोगात्मक भागीदारी यांसमोर प्राजचे उदाहरण नक्की असेल, असेही डॉ लेले म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ प्रमोद चौधरी म्हणाले, “२०२० साली कोविड महामारीच्या काळात, प्राजने बायोएनर्जी सोल्यूशन्समधील आपल्या प्रस्थापित नेतृत्वाच्या क्षेत्राच्या पलीकडे जात परीघ विस्तारत त्यामध्ये धोरणात्मकरित्या विविधता आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे संस्थेच्या विकासाला देखील महत्त्वपूर्ण वळण मिळाले असे म्हणता येईल. या अंतर्गत आम्ही रिन्युएबल केमिकल्स आणि मटेरिअल्स या क्षेत्राकडे वळालो, विशेषत: बायोप्लॅस्टिकवर भर दिला.” एकीकडे प्लॅस्टिकच्या संकटाला तोंड देताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या विकसित भारत अभियानासाठी एक शाश्वत, नाविन्यपूर्ण भविष्य निर्माण करीत भारताला जागतिक जैव-उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या सामायिक दृष्टीकोनाला आम्ही समर्पित आहोत ही जाणीव या दरम्यान आम्हाला प्रकर्षाने जाणवत होती याचे समाधान असल्याचेही डॉ चौधरी यांनी नमूद केले.
