Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

तेलंगणाच्या धर्तीवर पुण्यात ही ‘डीजे’ वर बंदी घालावी

पुणे  : तेलंगणा राज्यातील हैद्राबाद पोलिसांनी अद्यादेश काढून मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या डीजे साउंड सिस्टम्स/डीजे साउंड मिक्सर/साउंड ॲम्प्लिफायर्स/ इतर उच्च ध्वनी उत्प्रेरक उपकरणे, मोठ्या आवाजाचे फटाके आदींचा वापर धार्मिक मिरवणुकीत करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास ५ वर्ष कैद आणि १ लाखापर्यत दंडाचे प्रावधान त्यांनी केले आहे. या प्रमाणे आपणही ध्वनीप्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर तसेच लेसर लाईटवर बंदी घालावी असे निवेदन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आज दिले.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे अनेक जणांना त्रास होतोय. डीजेमुळे अनेकांच्या कानाला इजा झाली तर अनेकांच्या कानाचे पडदे फाटून त्यांना कायमचे बहिरेपणा आल्याच्या देशभरात अनेक घटना घडल्या आहेत. डीजेमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. पुण्यात नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजामुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. डीजेवर बसून झेंडा फडकावत असताना विद्युत तारांच्या स्पर्श होऊन वडगावशेरी येथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पैगंबर जयंती दरम्यान घडली होती. गरोदर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांना डीजेच्या आवाजाचा त्रास होतो. साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी, त्याची आवाज मर्यादा किती असावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली प्रसिद्ध केली आहे.मात्र त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. डीजे सुरु असलेल्या मिरवणुकीसोबत चालताना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस कर्मचार्‍यांना व अधिकाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो, मात्र दुर्देवाने पोलीस सुद्धा यात बोटचेपी भूमिका घेत आहेत असे दिसते.

डीजे प्रमाणेच लेसर लाईटचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे अनेकांच्या डोळ्याला त्रास होतो. अनेकांना यामुळे कायमचे अंधत्व आले आहे. या गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीत कोल्हापूरमध्ये एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली होती. यावेळी बंदोबस्तात असणाऱ्या अनेक पोलिसांना ही याचा त्रास झाला. सण उत्सवांच्या या बीभत्स प्रकारामुळे समाजावर अनिष्ट परिणाम होत आहे.

आपणही याबाबत सकारात्मक आहात हे जाणवते. पुण्यातील दहीहंडी तसेच गणेश उत्सव यापूर्वी आपण मंडळांची बैठक घेऊन त्यांना लेसरचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे आपण उत्सवकाळात यावर बंदी घातली होती. मात्र तरीही आपला बंदी आदेश झुगारून अनेक मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत तसेच महम्मद
पैगंबर जयंती मध्ये डीजे आणि लेसर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसला. अनेक पुणेकरांना याचा त्रास झाला. याविरुद्ध अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या मात्र पोलिसांनी कार्यवाही न करता फक्त वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली.

डीजेच्या तीव्र आवाजाचा धोका ओळखून अनेक राज्य यावर बंदी घालत आहेत. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणेच तेलंगण सरकारच्या वतीने हैद्राबाद पोलिस आयुक्तांनी ३० सप्टेबर रोजी एक अद्यादेश काढून डीजे साउंड सिस्टम्स/डीजे साउंड मिक्सर/साउंड ॲम्प्लिफायर्स/ इतर उच्च ध्वनी उत्प्रेरक उपकरणे, मोठ्या आवाजाचे फटाके आदींचा वापर धार्मिक मिरवणुकीत करण्यावर बंदी घातली आहे.

सण उत्सवाच्या काळात पोलिसांकडे डीजे, फटाके आणि तत्सम प्रकारच्या इलेक्ट्रोनिक वस्तूंचा वापर करून ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या त्याचप्रमाणे बहुतांश वेळा धार्मिक तेढ ही निर्माण झाले. यामुळे धार्मिक मिरवणुकीत अशी उपकरणे वापरण्यावर त्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात येणार असून सबंधित व्यक्तीला ५ वर्षाचा तुरुंगवास आणि १ लाख रुपया पर्यंतचा दंडाची तरतूद त्यांनी केली आहे.

डीजे आणि लेसरवर बंदी घालावी यासाठी मी माझ्या कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही निवेदन दिले आहे. आपल्याला ही गणेशउत्सव तसेच दहीहंडी दरम्यान डीजे सोबतच ध्वनी प्रदूषण करणारे सर्व घटक, लेसर, प्लाज्मा लाईट यावर बंदी घालण्याबाबत पत्र दिले होते. आरोग्यावर होणारे व्यापक दुष्परिणाम बघता या घटकांवर आपण पुणे शहरात बंदी घालावी, तसेच सर्व सण आणि महापुरुषांच्या जयंत्या इत्यादी कार्यक्रमांत डीजे व लेसरला परवानगी देऊ नये अशी विंनती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading