Tuesday, October 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी प्राचार्य नंदकुमार सागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

पुणे  : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पुणे विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार पंढरीनाथ सागर यांनी सोमवारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमधून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, विविध विषय संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि शिक्षक प्रतिनिधी यांचाही सहभाग होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सासवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिक्षक बांधव-भगिनी एकत्र आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित शिक्षकांचा समूह पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाला.
यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या प्रतिनिधीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नंदकुमार सागर यांनी शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्रातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विविध विषय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका व्यक्त केली. शिक्षकांच्या सेवा व वेतनविषयक प्रश्नांसह जुनी पेन्शन योजना, शाळांना मिळणारे अनुदान, शैक्षणिक धोरणे तसेच शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या विविध अशैक्षणिक कामांच्या प्रश्नांवर संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी सेकंडरी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी,पुणे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त ,पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, विविध विषय संघटनांचे प्रतिनिधी, अल्पसंख्याक शाळांचे प्रतिनिधी, आश्रमशाळा संघटनांचे पदाधिकारी तसेच पुणे विभागातील शिक्षक,शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading