पुना क्लब मॅजिशियन्स् संघाला विजेतेपद !!
पुणे, ५ ऑक्टोबरः डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत पुना क्लब मॅजिशियन्स् संघाने डेक्कन जिमखाना ऐसेस संघाचा ३-१ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स्च्या अनिश केअरिंग व अंगद सहानी या जोडीने डेक्कन जिमखाना ऐसेसच्या उदय पुंडे व सचिन बिचे यांचा ७७-३२ असा पराभव केला. एकेरीच्या सामन्यात विग्नेश संघवी याने सिध्दार्थ टेंभे याचा ४८-१८ असा पराभव करून पुना क्लबने २-० अशी आघाडी घेतली. डेक्कनच्या समर खंडेलवाल याने दिनेश मेहतानी याचा १५१-१०५ असा पराभव करून ही आघाडी १-२ अशी कमी केली. सुरज राठी याने डेक्कनच्या प्रशांत नातू याचा ७२-६१ असा पराभव करून पुना क्लब संघाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून देत विजेतेपद मिळवले.
तृतीय स्थानासाठीचा सामन्यामध्ये पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाने डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. विजेत्या पुना क्लब मॅजिशियन्स् संघ आणि उपविजेत्या डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे कार्यकारी संचालक गिरीष व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बिलीयर्डस् आणि स्नुकर संघटनेचे अध्यक्ष चिराग रामकृष्णन्, आयबीएसएफचे माजी अध्यक्ष राजन खिंवसरा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संचालक समर खंडेलवाल यांनी तर, आभार बिलीयर्डस् आणि स्नुकर विभागाचे सचिव सतिश शाळीग्राम यांनी मानले.
अंतिम सामन्याचा निकालः
पुना क्लब मॅजिशियन्स् वि.वि. डेक्कन जिमखाना ऐसेस ३-१ (अनिश केअरिंग/अंगद सहानी वि.वि. उदय पुंडे/सचिन बिचे ७७-३२; विग्नेश संघवी वि.वि. सिध्दार्थ टेंभे ४८-१८; दिनेश मेहतानी पराभूत वि. समर खंडेलवाल १०५-१५१; सुरज राठी वि.वि. प्रशांत नातू ७२-६१);
तृतीय स्थानासाठीचा सामनाः
पीवायसी जिमखाना वॉरीयर्स वि.वि. डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स ३-० (निशाद चौगुले वि.वि. श्रीवस्त शेवडे १५०-१४६; राजवर्धन जोशी वि.वि. विठ्ठल ढमाले ४५-२९; रोहीत नारगोलकर/आनंद आपटे वि.वि. अजिंक्य मेहता/आदित केंभवी ७०-४६);
