संगीत, नृत्य, नाट्य यांची अनुभूती देणाऱ्या ‘अनवट’ या विशेष कार्यक्रमाचे ५ व ६ ऑक्टोबर रोजी आयोजन
पुणे : पुण्यातील नवसर्जन ललित कला फाउंडेशन हे ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या सहयोगाने शनिवार, दि. ५ व रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील श्रीराम लागू रंग अवकाश येथे संगीत, नृत्य, नाट्य यांची अनुभूती देणाऱ्या ‘अनवट- अनलिशिंग आर्टिस्ट्री बियाँड लिमिट्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. दोन्ही दिवशी सकाळी १० ते दुपारी १ आणि सायं ५ ते ९ अशा दोन सत्रांत सदर कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
कथक गुरु डॉ रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ऋजुता सोमण कल्चरल अकादमी (आरएससीए) ला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गुरु डॉ रोहिणी भाटे यांच्या शिष्या व सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना ऋजुता सोमण यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना ऋजुता सोमण म्हणाल्या, “माझ्या गुरु डॉ रोहिणी भाटे यांनी कथक क्षेत्रात दिलेले योगदान सर्वांनाच माहित आहे. रोहिणीताई या नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका, तत्वज्ञ, लेखिका तर होत्याच शिवाय त्या एक प्रगल्भ वक्त्या, संगीतकार देखील होत्या. नृत्यामध्ये त्यांनी अनेक अनवट, अपवादात्मक व वेगळ्या धाटणीचे प्रयोग केले. यामध्ये कलादिग्दर्शनासोबतच अनेक तांत्रिक प्रयोगांचा देखील समावेश आहे. पुण्यात त्यांनी खऱ्या अर्थाने कथक या नृत्यप्रकाराचा पाया रचण्याबरोबरच त्याच्या वाढीमध्येही मोलाची भूमिका बजावली. ही परंपरा पुढे नेत कथक मध्ये अनेकविध प्रयोग करीत असताना डॉ रोहिणी भाटे यांना आदरांजली अर्पण करावी या उद्देशाने आम्ही या परिसंवादाचे आयोजन करीत आहोत. यासोबतच प्रेक्षकांना आपल्या समृद्ध कला वारशाची माहिती व्हावी, पारंपारिक कलाप्रकार नव्याने समजावेत हा या उपक्रमामागील आमचा हेतू आहे.”
या दोन दिवसीय कार्यक्रमात नृत्य, नाट्य, संगीत, चित्रपट, कला अशा प्रत्येक क्षेत्रातील सर्जनशील कलाकार सहभागी होतील. याद्वारे कलाप्रेमी, विद्यार्थी आणि या विषयात रस असणाऱ्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असेल असेही सोमण यांनी नमूद केले.
परिसंवादाच्या पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्रात कथक नृत्यांगना प्राजक्ता राज, प्रसिद्ध दिग्दर्शक अनुपम बर्वे आणि कथक गुरु शमा भाटे यांचा संवादात्मक कार्यक्रम होईल. पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांचे गायन होईल. यानंतर ऋजुता सोमण कल्चरल अकादमीच्या शिष्यांचे कथक सादरीकरण होईल. कथक नृत्यांगना ऋजुता सोमण यांच्या ‘ऋजु टॅप’ या विशेष प्रयोगात्मक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची (६ ऑक्टोबर)ची सुरुवात ही सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर यांच्या ‘वेणूगान’ या कार्यक्रमाने होईल. ‘कवीताली’ या ऋजुता सोमण आणि त्यांच्या शिष्यांच्या समूह सादरीकरणाने सकाळच्या सत्राचा समारोप होईल. गुरु रोहिणी भाटे यांच्या दुर्मिळ रचनांचा समावेश असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक मेजवानी ठरेल.
दुसऱ्या दिवसाच्या सायंकालीन सत्राची सुरुवात चित्रकार राजू सुतार आणि क्रांती कानडे यांच्या परिसंवादात्मक कार्यक्रमाने होईल तर तालयोगी पद्मश्री पं सुरेश तळवलकर ह्यांच्या परिसंवादाने दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप होईल.
