कुठलाही गाजावाजा न करता मुलुंडच्या राजाचे विसर्जनकार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मदतीची अपेक्षा.
मुंबई – ऐन गणरायाच्या आगमनावेळी बॅनर बांधणा-या दोन कार्यकर्त्यांना बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली होती. या दुर्घटनेत प्रीतम थोरात या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू तर प्रसाद पाटील हा गंभीररित्या जखमी झाला होता. या प्रकरणात कार चालक शक्ती अलग याला पोलिसांनी खारघर येथून अटक केली होती. त्यामुळे दु:खाचे सावट असलेल्या मुलुंडचा राजा या गणरायाचे विसर्जन कोणत्याही प्रकारचा गाजावाजा तसेच रोशनाई न करता शांततेत मुलुंड येथील मोरर्या तलावात करण्यात आले.
मुलुंड पुर्व गव्हाणपाडा येथील हिट अँन्ड रन दुर्घटनेत प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी प्रसाद पाटील याच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रसाद पाटील याच्या उपचारावर साधारण 35 लाख रुपये खर्च अपेक्षीत असून त्याच्या मदतीसाठी अनेकांना आवाहन करण्यात आले आहे. घटनेनंतर ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रीतम थोरात याच्या कुटुंबीयांची भेट घेतली तर रुग्णालयात जाऊन प्रसाद पाटील याची विचारपुस केली.
या घटनेनंतर मुलुंडचा राजा मंडळावर शोककला पसरली होती. कुठल्याही प्रकारची रोशनाई तसेच गाजावाजा न करता रात्री बारा नंतर मुलुंड येथील मोरर्या तलावात विसर्जन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी अनेक स्वयंसेवकांची एक टिम कार्यरत करण्यात आली होती. त्यांच्या मार्फत विसर्जन, साफसफाई तसेच देखरेख करणे या सारखे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पालिकेच्या टी विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटणे तसेच पालिका अधिकारी, कर्मचारी व शिवसेनेचे पदाधिकारी अभिजीत चव्हाण आणि कार्यकर्ते यांनी यावेळी विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांना सर्वोतोपरी मदत केली.
