अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान करण्यास उत्सुक – सुनीता विल्यम्स
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : नासाच्या स्टारलाइनर या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम वाढल्यामुळे जगभरातील संशोधक आणि अंतराळवीरांचे चाहते चिंतेत असताना हे अंतराळवीर कणखर मनाने अंतराळात राहत आहेत. इतकेच नव्हे तर अंतराळ हे आपले आवडते ठिकाण आहे, असे सुनीता यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवरील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही दोन्ही अंतराळवीरांनी नमूद केले.
अंतराळ हे आपले आवडते ठिकाण आहे. त्यामुळे येथील मुक्काम वाढल्याची खंत नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येथे राहणे आनंद देणारे आहे. गरज पडल्यास येथे आम्ही आठ ते दहा महिने ही राहू शकतो. मात्र, आम्हाला आपले कुटुंब आणि पाळीव प्राण्यांची तीव्रतेने आठवण येत आहे, असे सुनीता विल्यम्स यांनी सांगितले.
बुच यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील आपला दिनक्रम उलगडून दाखवला. बुच हे चार वाजता उठतात तर सुनिता साडेसहा वाजता उठतात. अंतराळात राहिल्यामुळे हाडांची घनता कमी होऊ नये यासाठी दोघेही दोन तास व्यायाम करतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आपला मुक्काम एवढा वाढेल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, आणीबाणीच्या परिस्थितीत असे होऊ शकते याची जाणीवही होती. व्यावसायिक जीवनात हे अनपेक्षित नाही, असे बुच यांनी स्पष्ट केले.
मतदान हे पवित्र कर्तव्य
आपल्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे आपले कर्तव्यच आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत हे कर्तव्य पार पाडण्याची आपली तीव्र इच्छा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून आपल्याला मतदान करता यावे याची तांत्रिक व्यवस्था करण्याची विनंती आपण नासाला केली आहे, असे या अंतराळवीरांनी सांगितले.
