शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कांद्याने महायुतीच्या डोळ्यात पाणी आणले. त्याची पुनरावृत्ती राज्यातील विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कांदा, सोयाबीन उत्पादकांसह बासमती तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या तिन्ही पिकांची निर्यात सुलभ आणि फायदेशीर ठरणार आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या खुल्या निर्यातीला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे निर्यात शुल्क 40 टक्क्यावरून 20 टक्के वर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीत वाढ होऊन स्थानिक बाजारपेठेतही कांद्याचे दर वाढणार आहेत. त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
तसेच केंद्र सरकारने कच्च्या खाद्य तेलावर 20 टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कच्च्या तेलावर कोणतेही आयात शुल्क नव्हते. त्याचप्रमाणे रिफाइंड तेलावरील आयात शुल्क साडे बारा टक्क्यावरून साडे बत्तीस टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत तेल उत्पादनाला प्रोत्साहन मिळून सोयाबीनला चांगले भाव मिळणार आहेत.
त्याचप्रमाणे केवळ भारत आणि पाकिस्तान पिकणाऱ्या आणि जगभरात मागणी असणाऱ्या बासमती तांदुळाच्या निर्यातीसाठी आकारण्यात येणारे निर्यात शुल्क केंद्र सरकारने रद्द केले आहे. त्यामुळे बासमतीच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.
