इस्राईलच्या विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात दहा पॅलेस्टिनी ठार
जेरुसलेम: वृत्तसंस्था
हमासच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पुकारलेल्या युद्धात गाझा पट्टी बेचिराख झाल्यानंतरही इस्रायलचे आक्रमण थांबलेले नाही. या युद्धात मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या ४० हजार पेक्षा जास्त झाली आहे. शुक्रवारी इस्राईलच्या विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात दहा पॅलेस्टिनी मरण पावले.
इस्राईलच्या सैन्याने गाझापट्टीत नाकाबंदी लागू केली आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. इस्राईलच्या हल्ल्यांमुळे गाझापट्टी पूर्ण उध्वस्त झाली असून या प्रदेशात सुस्थितीत असलेली एकही इमारत उभी नाही.
इस्राईली हल्ल्यांच्या भीतीने पॅलेस्टाईनमधील नागरिक वारंवार स्थलांतर करत आहेत. मात्र कोणत्याही ठिकाणी ते सुरक्षित नाही. इस्राईलच्या विमानांचा हल्ला केव्हाही आणि कुठेही होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. हल्ल्यांपासून बचावण्यासाठी उभारण्यात आलेल्या आसरा छावण्यांमध्ये अस्वच्छता, किमान सुविधांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
