पाकिस्तानला लॉटरी; पेट्रोलियमचा मोठा साठा सापडला
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मोठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. सध्या कंगाल अवस्थेत असलेल्या, आर्थिक मदत आणि गुंतवणुकीसाठी वळवण फिरणाऱ्या पाकिस्तानला ही जणू लॉटरीच लागली असून येत्या काही वर्षात या देशाचे भवितव्य बदलून जाऊ शकते. हा पेट्रोलियम साठा जगातील चौथा सर्वात मोठा साठा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानच्या समुद्रात पेट्रोलियम साठ्याचा शोध घेण्यासाठी मित्र राष्ट्राच्या तांत्रिक सहकार्याने सलग तीन वर्ष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मोठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. या ठिकाणी विहिरी खणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूंचा साठा असलेले ठिकाण शोधण्यात यश आले असले तरीही प्रत्यक्ष विहिरी खणणे आणि त्यातून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मिळविणे या प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर मात्र या नैसर्गिक देणगीने देशाच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
