एकनाथ खडसे यांनी गणेशाकडे केली ‘ही’ प्रार्थना
जळगाव: प्रतिनिधी
राज्यातील राजकारण चांगले राहिलेले नाही. जनता महागाईने त्रस्त आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर यावे, अशी प्रार्थना भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यावर उभे असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गणेशाकडे केली आहे.
मूळचे भाजपचे मात्र नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेलेले खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये परतण्याची इच्छा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत आपण पक्षात आलेलोच आहोत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे आपला पक्षात अधिकृतपणे प्रवेश करून घेतला जात नाही, असा आरोप खडसे यांनी नुकताच केला होता. त्याबरोबरच, फडणवीस आणि महाजन हे नड्डा यांच्यापेक्षा मोठे झाल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली होती.
भाजपा प्रवेशाचे घोंगडे भिजत पडल्यामुळे ताटकळलेल्या खडसे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना अखेरचा इशाराही दिला आहे. भाजपामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आपण फार काळ वाट बघू शकत नाही. लवकरात लवकर आपल्याला पक्षात प्रवेश न दिल्यास आपण पुन्हा अधिक जोमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सुरू करू, असे ते म्हणाले.
