टाईम या नियतकालिकाचा AI विषयावर विशेष अंक प्रसिद्ध; मुखपृष्ठावर अनिल कपूर
नवी दिल्ली:
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या टाईम या नियतकालिकाने कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर विशेष अंक प्रसिद्ध केला असून त्याच्या मुखपृष्ठावर या क्षेत्रातील नामवंतांची छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर यांचेही छायाचित्र आहे. अनिल कपूर यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी काय संबंध, असा प्रश्न पडून अनेकांचा आ वासला असेल. प्रत्यक्षात त्यांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे.
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जगाला कलाटणी देणारे ठरणार आहे. सध्याच्या काळातही या तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जात आहे. मात्र, तंत्रज्ञान कोणतेही असो, ते वरदानही ठरते आणि शापही! त्याचा वापर कसा आणि कोणत्या कारणासाठी केला जातो यावरून त्याची उपयुक्तता किंवा उपद्रवमूल्य ठरते.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब प्रतिमा तयार करता येते. इतकेच नव्हे तर त्याचा आवाजही आपल्याला हवा तसा वापरता येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तीच्या खाजगीपणाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये, प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रतिमेचा गैरवापर करून अपप्रचार केला जाऊ नये, कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय तिची प्रतिमा अथवा आवाज यांचा वापर केला जाऊ नये, यासाठी अनिल कपूर यांनी नेटाने न्यायालयीन लढा दिला आणि त्यात ते यशस्वीही ठरले. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या गैरवापराला आळा घालण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच टाईमने अनिल कपूर यांच्या छायाचित्रांचा समावेश कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला आहे.
टाईमने आपल्या मुखपृष्ठावर दखल घेतलेली दुसरे उल्लेखनीय भारतीय म्हणजे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव. माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान याचा विकास आणि वापर वृद्धिंगत करण्यासाठी सेमीकंडक्टर चिप हे कळीचे साधन आहे. सध्याच्या काळात सेमीकंडक्टरचे उत्पादन ही ठराविक मोजक्या देशांची मक्तेदारी असून त्यांच्यावर संपूर्ण जगाला अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी वैष्णव यांनी भारताला ‘चिप चॅम्पियन’ बनविण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी अनेक आव्हानांना तोंड देऊन सेमी कंडक्टर उत्पादनाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तज्ञांची फौज ते तयार करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन टाईम नियतकालिकाने आपल्या मुखपृष्ठावर त्यांच्या छायाचित्राला स्थान दिले आहे.
याच यादीतील तिसरे महत्त्वाचे भारतीय नाव म्हणजे इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी. नीलकेणी यांनी आपल्या आयुष्यातील पंधरा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी शासनाच्या वतीने किंवा स्वयंसेवी पद्धतीने सर्वसामान्य लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी अर्पित केला आहे, असे टाईमने नमूद केले आहे.
