महायुतीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्या, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे गणारायाल साकडे
मुंबई: सध्याच्या काळात महायुतीच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्याच्या अनुषंगाने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी, महायुतीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्या, असे अजब साकडे गणरायाच्या चरणी घातले आहे.
अंजीरवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भुजबळ यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
महायुतीतील घटक पक्षांना एकत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे कोणतेही वक्तव्य करताना महायुतीच्या नेत्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या वक्तव्याने कोणताही वाद निर्माण होईल अथवा आपल्यात भेदभाव आहे असे चित्र जनतेसमोर उभे राहील अशी विधाने महायुतीच्या नेत्यांनी करू नयेत, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
घटक पक्षांना न्याय देण्याचे दिल्लीतून आश्वासन
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह महायुती सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांना समान न्याय दिला जाईल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मिळाली असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला.
राजकीय समीकरणे बदलल्याने आवक-जावक
सध्याच्या काळात राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप असे सहा पक्ष कार्यरत आहेत. बदललेल्या समीकरणांमुळे काहीजण असे आहेत की ज्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री होती पण प्रत्यक्षात ती मिळू शकत नाही. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी काही जणांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आवक जावक होत आहे. ते स्वाभाविकच आहे, असेही भुजबळ म्हणाले.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे का, हा माझा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीतील नेत्यांना सवाल आहे. याला कोणीही तयार होणार नाही याची आपल्याला खात्री आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशीच सर्वांची भूमिका आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला यापूर्वीच दहा टक्के आरक्षण दिलेले आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
