स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य!
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत गणेशोत्सवाचा उत्सव आता अक्कलकोटमध्ये एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस… आणि सावळ्याच्या आयुष्यातील एका गूढ अध्यायाचा होणार अखेर उलगडा! आजवर सावळ्याला सतावणारे प्रश्न, डोळ्यांसमोर दिसणारी ती अस्पष्ट दृश्यं आणि आपल्या भूतकाळाबद्दल त्याच्या मनात असलेली अस्वस्थता… या सगळ्यांची उत्तरं अखेर बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी त्याला मिळणार आहेत. आणि या सत्याच्या उलगड्यामागे आहे स्वामींचीच लीला! हा क्षण त्याच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा तर ठरेलच, पण त्याच्याशी जोडलेल्या अनेकांचं नशीबही ढवळून काढणार आहे. स्वामींच्या लीलेने गणपती विसर्जनाच्या वेळी उलगडणार सावळ्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य. पहा, ‘जय जय स्वामी समर्थ – उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’, दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर.
सावळ्याला त्याचं सत्य कळावं, त्याच्या मनातला अंधार दूर व्हावा आणि त्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, यासाठी स्वामींनी आतापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहिलं आहे. सावळ्याला इराच्या सहवासात आणण्यापासून ते त्याच्यातील माणुसकी जागी करण्यापर्यंत… स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे एक मोठा हेतू दडलेला आहे. पण आता त्या लीलाचा सर्वात मोठा टप्पा समोर आला आहे. बाप्पाची मूर्ती सावळ्याच्या छातीला स्पर्श करताच त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा तीच दृश्यं उमटतात… मात्र यावेळी ती अस्पष्ट नसतात. त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो. त्याचे खरे आई-वडील, त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना आणि त्या घटनेमागचा चेहरा… सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोर येतं. आणि त्या चेहऱ्याची ओळख होताच सावळ्याच्या पायाखालची जमीनच सरकते! स्वामींनी सावळ्याला हे सत्य याच क्षणी का दाखवलं? सावळ्याच्या भूतकाळातील त्या भयंकर घटनेमागे नेमकं कोण आहे? आणि हे सत्य समोर आल्यानंतर सावळ्याच्या मनात पुन्हा सूडाची आग भडकणार की स्वामींच्या शिकवणीमुळे तो त्या आगीतून स्वतःला मुक्त करणार?
दरम्यान, मार्तंडने स्वामी स्थानावर केलेल्या आव्हानाने सेवेकऱ्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. स्वामींच्या भक्तीला आणि प्रचितीला थेट आव्हान देत त्याने अक्कलकोटमध्ये खळबळ माजवली आहे. या सगळ्यात कपिलाचा विश्वास डळमळताना दिसतो, तर सुंदरा मात्र स्वामींवरच्या श्रद्धेवर ठाम राहून सर्वांना धीर देत आहे. मार्तंडने स्वामी स्थानातील दिवा विझवून स्वामींच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे. स्वामींनी विसर्जनाच्या वेळी येण्याचा शब्द दिला आहे आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी मोठं दडलेलं असतं. मार्तंडचं आव्हान…बाप्पाचं विसर्जन, सावळ्याच्या सत्याचा उलगडा आणि स्वामींचं आगमन हे तिन्ही एकाच वेळी घडत असताना येत्या भागांमध्ये भावनांचा कल्लोळ, थरारक नाट्य आणि अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत.
भक्तीची परीक्षा… आणि सावळ्याच्या सत्याचा उलगडा — या सगळ्या घटनांचा धागा स्वामींच्या एका अदृश्य योजनेशी जोडलेला आहे का? बाप्पाच्या विसर्जनाच्या पवित्र क्षणी सावळ्याला त्याचं खरं सत्य कळणार आहे… पण हे सत्य त्याच्या आयुष्याला कोणतं नवं वळण देणार? कर्माचं वर्तुळ कसं पूर्ण होतं आणि विघ्नं कशी दूर होतात, याचा प्रत्यय देणारे पुढचे भाग चुकवू नका. बघत रहा ‘जय जय स्वामी समर्थ’, दररोज कलर्स मराठीवर.
