गणेशोत्सवादरम्यान घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती
पनवेल: यावर्षी विघ्नहर्ता गणेश प्राणप्रतिष्ठा आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिन एकाच दिवशी दि. ७ रोजी येत आहेत. याचे औचित्य साधून गणेशोत्सवादरम्यान घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण प्रगती फाउंडेशन, मास्टेक फाउंडेशन, नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका यांनी पुढाकार घेतला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने ७ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू दिन म्हणून घोषित केला आहे. ‘स्वच्छ हवा, निळे आकाश’ ही या दिवसाची संकल्पना आहे. सध्याच्या काळात शुद्ध हवा ही अत्यंत दुर्मिळ होत असताना प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाचीच जबाबदारी बनलेली आहे. या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापनात जनसहभाग वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक भान असलेली कॉर्पोरेट कंपनी यांनी परस्पर सहकार्याने ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक अथवा सांस्कृतिक उत्सव नाही. तर ते समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या उत्सवाची स्थापनाच जनजागृतीच्या उद्देशाने करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेशोत्सवांना भेट देऊन त्यांच्या सहकार्याने व्याख्याने, प्रदर्शन, दृक् श्राव्य सादरीकरण, प्रात्यक्षिक अशा उपक्रमातून कचरा व्यवस्थापन आणि लोकसहभाग या बाबत जनजागृती केली जाणार आहे. ओला, सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रियेचे विकेंद्रीकरण, ई कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक वापरावर नियंत्रण अशा अनेक बाबींची माहिती या मोहिमेद्वारे अधिकाधिक नागरिकांना देण्याचा प्रयत्न असणार आहे.
गणेशोत्सवाच्या नंतरही विशेषत: शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने समाजाच्या सर्व स्तरात कचरा व्यवस्थापनाबाबत जाणीव जागृतीचे काम सुरूच ठेवले जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफळे यांनी दिली.
