मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरागे यांची भेट
मुंबई: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवान हालचाली केल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरागे पाटील यांच्याशी अंतरवाली सराटी येथे चर्चा करून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अब्दुल सत्तार यांनी मनोज जरागे पाटील यांच्याशी अंतरवाली सराटी येथे तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या प्रलंबित प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा या मागणीबरोबरच जरांगे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
सत्तार आणि जरांगे पाटील यांच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर अब्दुल सत्तार हे त्वरित मुंबईला निघाले असून त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या दोन्ही प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे फॅक्टरचा मोठा फटका सहन करावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ महायुतीच्या बाजूने अनेक नकारात्मक मुद्दे असताना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यातल्या जास्तीत जास्त मुद्द्यांचा निपटारा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
