Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्यासाठी अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरू

मुंबई:  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असली तरीही त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचे श्रेय लाटण्यासाठी अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीत लाडकी बहीण योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गायब करण्यात आला आहे तर या जाहिरातीला ‘दादाचा वादा’ ही टॅगलाईन वापरण्यात आली आहे. या जाहिरातीत अजित पवार वगळता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अथवा महायुतीच्या इतर कोणत्याही नेत्याचे छायाचित्रही नाही. या जाहिरातीत लाडकी बहीण योजनेत येणाऱ्या अडचणीच्या निवारणासाठी महिलांना संपर्क साधता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत अजित पवार लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करीत आहेत. यात्रेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या गुलाबी रंगाच्या गाड्या आणि दादांचे गुलाबी जाकीट याद्वारे केले जाणारे पिंक पॉलिटिक्स सध्या चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना अधिकारी प्रमाणात आकर्षित करण्याचे अजित पवार गटाचे प्रयत्न आहेत. 

महायुतीत निर्माण होऊ शकतात गैरसमज 

अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या अशा कृत्यांमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होऊ शकतात, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासकीय योजना आहे. या योजनेचे श्रेय जसे अजित दादांना आहे तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. अजित पवार गटाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात या योजनेचा प्रचार, प्रसार करताना अजित दादांचे मोठे छायाचित्र लावावे. त्यांचे आपल्या नेत्यावरचे प्रेम समजू शकते. मात्र, महायुतीत गैरसमज निर्माण होतील, अशी कृत्य करू नये, असे आवाहनही शिरसाट यांनी केले. 

अजित पवार गटाने फेटाळले आरोप 

लाडकी बहिणी योजनेचे नावच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. सरकार दप्तरी तशी नोंद आहे. ही योजना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली. ते तिला उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, असे नाव देखील देऊ शकले असते. मात्र, तसे करण्यात आलेले नाही. योजनेच्या अर्जावरही ठळकपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेबाबत जनतेच्या मनात, पर्यायाने महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही गैरसमज होण्याचे कारण नाही, अशा शब्दात अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading