अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी देण्यात आलेला निधी लाडकी बहीण कडे वळविला – प्रकाश आंबेडकर
नाशिक: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणण्यासाठी सरकारने पैसा कुठून आणला? अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी देण्यात आलेला निधी या योजनेसाठी वापरण्यात आला का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केला आहे.
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, या योजनेला विरोधकांनी सुरुवातीपासूनच टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यातच आता आंबेडकर यांच्या सवालांची भर पडली आहे.
आदिवासींच्या निधीचे विवरण जाहीर करा
आदिवासींच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी सात हजार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणण्यासाठी वर्ग केला गेला काय, असा आंबेडकर यांचा सवाल आहे. याची पडताळणी करण्यासाठी सरकारने आदिवासींसाठी तरतूद केलेला निधी आणि खर्च झालेला निधी याचा लेखाजोखा प्रसिद्ध करावा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
गावित यांच्या आंदोलन स्थळी आंबेडकर यांनी दिली भेट
पेसा अंतर्गत आदिवासी उमेदवारांची भरती करावी, या मागणीसाठी जे पी गावित यांनी आंदोलन सुरू केले आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असलेले आंबेडकर यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदिवासींच्या प्रश्नावरून सरकारवर टीकेची झोड उठवली.
आदिवासींच्या शिक्षणाची सरकारला नाही आच
राज्याच्या लोकसंख्येत आदिवासींचे प्रमाण साडेसात टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारला आदिवासींच्या शिक्षणाची कोणतीही आच नाही. पेसा अंतर्गतही बोगस आदिवासींची भरती करण्यात आली आहे. पडताळणीनंतर बोगस ठरलेल्यांना खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर खऱ्या आदिवासींची भरती करण्यात आलेली नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
गावित यांनी तिसऱ्या आघाडीत यावे
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस बरोबर लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा काडीमोड होईल तेव्हा होईल. तूर्तास आदिवासींचे नेतृत्व करणाऱ्या जे पी गावित यांनी आमच्याबरोबर तिसऱ्या आघाडीत यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी गावित यांना केले.
