Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

रसिकांनी अनुभवली राधा-कृष्ण नात्याचे चांदणे शिंपणारी बहारदार नृत्यनाटिका

पुणे  : वृंदावनवासी श्रीकृष्ण आणि राधेच्या युगानुयुगांच्या नात्याचे अनेकविध पदर उलगडणारी, संस्कृत भाषेचे माधुर्य सांगणारी, कलाकारांच्या नृत्याभिनयाने खुललेली आणि राधा-कृष्णाच्या नात्याचे चांदणे शिंपणारी बहारदार नृत्यनाटिका रसिकांनी अनुभवली. दाक्षिणात्य तसेच उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि भरतनाट्यममधील मार्गम् याला देखणी प्रकाशयोजना, आकर्षक पेहराव आणि समूहनृत्यांची जोड मिळाल्याने हे सादरीकरण रसिकांना खरोखरच वृंदावनाच्या वातावरणात नेणारे ठरले.

जन्माष्टमीचे औचित्य साधून श्री श्री राधा माधव क्लासिकल फाईन आर्ट्स आणि सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ. स्वाती दैठणकर यांच्या नुपूरनाद संस्थेच्या वतीने आयोजित ‘दान केलि कौमुदी’ या संस्कृत प्रहसन नृत्यनाटिकेचे सादरीकरण रविवारी सायंकाळी टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाले. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.

सुरवातीला स्वाती दैठणकर यांनी नृत्य संरचनाकार, नृत्यांगना, संशोधन आणि सूत्रधाराच्या चौफेर जबाबदाऱ्या सांभाळत या नृत्यनाटिकेची पार्श्वभूमी रसिकांना विशद केली. पाठोपाठ वृंदावनवासी सुप्रसिद्ध आचार्य रूप गोस्वामी (इ. स. १४८९- इ. स. १५६४) लिखित ‘दान केलि कौमुदी’ हे संस्कृत प्रहसन डा. स्वाती, त्यांच्या शिष्या आणि चमूने अतिशय परिणामकारक पद्धतीने सादर केले.

दैठणकर म्हणाल्या, ‘दान केलि कौमुदी’ या नाटिकेतील कथानक गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दान घाटी या ठिकाणी घडते. राधा आणि कृष्णाच्या नात्याचा एक वेगळा पैलू या नाटिकेद्वारे मनोरंजनात्मक पद्धतीने व शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. आचार्य रूप गोस्वामी हे श्री मध्वाचार्य आणि श्री चैतन्य महाप्रभू यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी भक्ति साहित्यात विपुल निर्मिती केली असून ‘दान केलि कौमुदी’ हे त्यांनी लिहिलेले संस्कृत प्रहसन दान लीलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे हे साहित्य नृत्यनाट्यरुपात बसविणे हे माझ्यासाठी गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच होते. दशरूपकातील एक रुपक असलेली ही भाणिका सामान्य प्रेक्षकांना कळावी आणि ती करीत असताना मूळ आशय कायम राहावा, हा विचार मी प्रकर्षाने विचार केला. भरतनाट्यम नृत्यशैली, संस्कृत श्लोकांचे गायन, संवादात्मक रचना यांच्या माध्यमातून राधा-कृष्णाचे तरल, नाजुक नाते, लौकिकाकडून पारलौकिकाकडे नेणारे, आत्मा – परमात्म्याचे एकरूपत्व दर्शवणारे कसे ठरते, याचा प्रत्यय रसिकांना देण्याचा हा प्रयत्न आहे.

या नृत्यानाटिकेला डॉ. धनंजय दैठणकर यांनी संगीत दिले आहे. दाक्षिणात्य संगीतासह उत्तर हिंदुस्तानी संगीतातील कलावती, मधुवंती, बहार, मल्हार, पूरियाधनाश्री आदी रागांमध्ये त्यांनी काही श्लोक बांधले होते. देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीत संयोजन, नंदिनी राव गुजर आणि मेहेर परळीकर यांनी गायन केले. नुपूर दैठणकर यांनी राधा तर कोहिनूर दर्डा यांनी कृष्णाची भूमिका साकारली. नुपुरनाद संस्थेच्या १२ नृत्य कलाकारांचाही यामध्ये समावेश होता. सादरीकरणानंतर नृत्यनाटिकेतील कलाकारांचा सन्मान राधा माधव क्लासिकल फाईन आर्ट्स न्यासाचे सचिव येमूल श्रीनिवास यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading