फडणवीस यांनी आधी ‘त्या’ मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे – खासदार संजय राऊत
मुंबई: महिलांची गैरवर्तन केल्याचे आरोप असलेले राज्य सरकारमध्ये दोन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आधी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे आणि त्यानंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर पलटवार म्हणून आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजी नगर दौऱ्याच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेल रामासमोर निदर्शने केली. दिशा सालीयान प्रकरणी जाब विचारण्यासाठी आपण आलो असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन एकमेकांना भिडले आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
आदित्य ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेल समोर हातात झेंडे घेऊन निदर्शने करणारे लोक भाजपचे कार्यकर्ते नव्हे तर त्यांचे पगारी नोकर होते. भाजपचा कारभार सध्या त्यांचे पगारी नोकर आणि पैसे घेऊन काम करणारी आयटी सेल यांच्याच ताब्यात आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
ठाकरे कुटुंबावर राज्याची श्रद्धा
ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राची श्रद्धा आहे. ठाकरे कुटुंबीयांवर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कितीही टीका केली तरीही आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.
भाजप हा भ्रमिष्ट पक्ष
भाजपकडे सध्या काहीही काम उरलेले नाही. तो एक भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्या कार्यकाळात महिलांवर, अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढले आहेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानंतर राज्यभरात अशी 27 प्रकरणे घडली आहेत. याबाबत त्यांना काही विचारणा केली तर ते लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी नवीन प्रकरणे घडवून आणतात, अशी टीकाही राऊत यांनी केली.
