विद्यार्थ्यांच्या आंदोलना यश, MPSCने २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली
पुणे / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) आणि IBPS ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी कालपासून आंदोलना बसले होते. अखेर आज त्यांच्या आंदोलनाला यश आले. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) बैठक घेत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता मागील २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. मात्र नेमके त्याच दिवशी केंद्राने IBPS ची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून काल पासून पुण्यातील अलका चौकात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला काल खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. तर शरद पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करीत या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर काल रात्री पासून आमदार रोहित पवार हे आंदोलन स्थळी होती. आज सकाळी पाहता पाहता विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांना देखील ही गर्दी आवरता येईना. शेवटी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) बैठक घेत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली. या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.
