Friday, September 25, 2026
Latest NewsPUNE

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने बालगंधर्व रंगमंदिरातील प्रलंबित कामांना मिळणार गती

पुणे : पुणे शहराचा सांस्कृतिक चेहरा असलेले बालगंधर्व रंगमंदिर हे शहराचे भूषण असून या ठिकाणी कलाकारांची आणि रसिक प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होता कामा नये अशा स्पष्ट सूचना छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिरोळे यांनी आज बालगंधर्व रंगमंदिराला भेट दिली. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, विद्युत विभागाचे उप अभियंते जयदीप अडसूळ, कनिष्ठ अभियंत्या मंगल मारतळेकर, भाग्यश्री देशपांडे हे देखील उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिरात अनेक प्रलंबित प्रश्नांची यादीच यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी वाचून दाखविल्यानंतर हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना शिरोळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “माझ्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात बालगंधर्व रंगमंदिर येते याचा खरेतर आमदार म्हणून मला अभिमान आहे. नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक समस्या आहेत; हे लक्षात आल्यानंतर आज मी स्वत: बालगंधर्व रंगमंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. पार्किंग, स्वच्छतागृह, एसी व्यवस्था अशा अनेक तक्रारी येथे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्या असून येत्या आठ ते दहा दिवसात त्यावर काम होईल.”

प्रशांत दामले म्हणाले, “भावनिकदृष्ट्या बालगंधर्व रंगमंदिर आम्हा सर्व कलाकारांच्या मनाच्या जवळ असून नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने पार्किग सुविधा, स्टेज व सभागृह येथील एसी व्यवस्था, स्वच्छतागृह, कॅन्टीन व लॉजिंग व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची तरतूद, आवश्यक साउंड सुविधा, अद्ययावत मेक अप रूम्स या प्रमुख समस्या आहेत. वारंवार कलाकार या सर्वांबाबत तक्रारी करत असतात. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे काना डोळा करीत आले आहेत. आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि विभागाचे उपायुक्त यांना नाटक आणि सांस्कृतिक चळवळीविषयी कळकळ आहे. त्यामुळे आता किमान ही प्रलंबित कामे मार्गी लागतील असा माझा विश्वास आहे.”

चांगले नाटक देण्याची जबाबदारी आम्ही कलाकार घेत असताना चांगल्या पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यायला नको का? असा प्रश्नही दामले यांनी केला. नूतनीकरण करताना बाकी खर्च होत आहेतच मात्र, वर नमूद बाबी यांवर का खर्च होत नाही असा सवाल दामले यांनी उपस्थित केला. पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खर्चासाठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी, अशी सूचनाही दामले यांनी केली.

सुनील बल्लाळ यांनी या सर्व समस्या ऐकून घेत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा काढून कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले आहे. यामध्ये प्रामुख्यान एस व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्वच्छता पार्किंग व्यव्यस्था आणि आवश्यक मनुष्यबळाची तरतूद करण्याच्या सूचनाही त्यांनी इतर अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading