आमदार झिशान सिद्दिकी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार
मुंबई: काँग्रेसचा मुंबईतील अल्पसंख्य समाजातील तरुण चेहरा आणि वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दिकी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर पकडलेला असतानाच सिद्दिकी यांनी आपल्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय जनताच घेईल, असे सूचक वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा वांद्रे येथून जाणार असून त्यावेळी आमदार सिद्दिकी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅलीद्वारे या यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी चर्चा आहे. त्याबद्दल बोलताना सिद्दिकी म्हणाले की, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांना दिलासा देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक महिलांना त्याचा मोठा लाभ प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील जनता सन्मान यात्रेत सहभागी होणार आहे.
न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी पक्षाकडून निमंत्रण नाही
काँग्रेसच्या वतीने दोन दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. निमंत्रणच काय, या यात्रेच्या आयोजनाबाबत माहितीही आपल्याला देण्यात आली नाही. त्याबद्दल आपल्या मनात कोणताही राग नाही किंवा नेत्यांबद्दल तक्रार नाही. मात्र, न्याय यात्रेत सहभागी होता न आल्याचे दुःख निश्चितपणे आहे, असेही सिद्दिकी म्हणाले.
पक्षाकडून नामांकन पत्र देण्यास नकार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पक्षाकडून संभाव्य उमेदवारांना नामांकन अर्ज देण्यात येत आहे. आपले नामांकन अर्ज आणण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना नामांकन अर्ज देण्यास नकार देण्यात आला. यावरून पक्षाची आपल्या बाबतची भूमिका स्पष्ट आहे. आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या वतीने तो मतदारसंघातील जनताच घेईल, असे सिद्दिकी म्हणाले.
