सरकारी तिजोरीच्या स्वार्थी वापरासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव – बाळासाहेब थोरात
मुंबई: सरकारी तिजोरी चा वापर करून जास्तीत जास्त काळ राजकीय प्रचार करता यावा, म्हणून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक पुढे ढकलण्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
निवडणूक आयोगाने नुकतीच जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. वास्तविक या दोन राज्यांबरोबरच महाराष्ट्र आणि झारखंड अशा एकूण चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र होतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. या विलंबामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर, पक्षनिरपेक्षतेवर आणि स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का?
वास्तविक निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. निवडणूक आयोगाची धुरा टी एन शेषन यांच्याकडे असताना राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाचा दबदबा होता. सध्याच्या काळात तो शिल्लक राहिलेला नाही. निवडणूक आयोगासारखी स्वायत्त संस्था एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येणे, लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
वन नेशन वन इलेक्शनचीही खिल्ली
जम्मू कश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या चार राज्यांची निवडणूक एकत्रपणे एकाच वेळी न घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचीही विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे. ज्या निवडणूक आयोगाला चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेता येत नाहीत तो निवडणूक आयोग देशातील लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी कशा घेऊ शकणार, असा सवाल या निमित्ताने उभा केला जात आहे.
