उद्धव ठाकरेंच्या मागणीला मित्र पक्षांकडूनच वाटाण्याच्या अक्षता
मुंबई: महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदचा उमेदवार आत्ताच जाहीर करावा, या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीला त्यांच्या मित्र पक्षांकडूनच वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. या मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मौन बाळगणे पसंत केले, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीश्वरांकडे बोट दाखवत हात वर केले.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात व्यासपीठावरूनच केली. मात्र, पवारांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री पदा च्या उमेदवारी बाबत चकार शब्दही काढला नाही. नाना पटोले यांनी, मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी बाबतचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठ घेतील. तो तुमचा आमचा अधिकार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौरा करून काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरेच असतील, अशी वृत्तही प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात अशी घोषणा न झाल्याने ठाकरे यांनी संयुक्त मेळाव्यात त्याबाबत मागणी केली. या मेळाव्याला विधानसभा निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित असल्याने या बैठकीतच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. आपण त्या नावाला पाठिंबा देऊ, असे सांगितले.
प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष, युती अथवा आघाडीला नेत्याचा चेहरा आवश्यक असतो. इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केले असते तर वीस-पंचवीस जागा वाढल्या असत्या, असा दावा करीत संजय राऊत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करीत आहेत.
मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच राऊत यांच्या या मागणीला धुडकावून लावले आहे. महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची गरज नाही. ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष विरोधात असतो तो मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करीत नाही अशी परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले आहे.
… तर महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख पद स्वीकारू नका
एकीकडे ठाकरे यांच्या या मागणीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कानाडोळा होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेतील खापरे गटातील नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शिवसैनिकांना उद्देशून एक जाहीर पत्र प्रसिद्ध केले आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जात असेल तरच त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारावी. त्यांचे नाव जाहीर केले जाणार नसेल तर ठाकरे यांनी ही जबाबदारी अजिबात घेऊ नये. लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडली आणि प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक फायदा झाला. ठाकरे यांनी जबाबदारी घ्यायची आणि दुसऱ्याचा फायदा करून द्यायचा, असे होऊ नये. या सर्व प्रकरणात काहीतरी वेगळेच राजकारण दिसत आहे, असा सूर नार्वेकर यांनी आपल्या पत्रात लावला आहे.
