सरकारकडून लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाच्या संस्थांचे अवमूल्यन – शरद पवार
मुंबई : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून विरोधी पक्ष नेते पदाची अप्रतिष्ठा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला. लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाच्या संस्थांचे अवमूल्यन सरकारकडून होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनते मल्लिकार्जुन खरगे यांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऑलिंपिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी त्यांना पुढील रांगेत बसविण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात येत आहे.
लोकशाही प्रक्रियेत सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, लोकसभा, राज्यसभा, संसद, पंतप्रधान या सर्व महत्वपूर्ण संस्था आहेत. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते ही देखील एक संस्था आहे. विरोधी पक्षनेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांना मागील रांगेत बसविण्यात आले. हा लोकशाही संस्थांचा अवमान आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांबरोबर होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यांचीही बैठक व्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांमध्ये करण्यात आली होती, याची आठवण पवार यांनी करून दिली. विद्यमान सरकारकडून विरोधी पक्षनेत्यांची जाणीवपूर्व अवहेलना केली जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
