‘तालचक्र’ हे पुस्तक शास्त्रीयतेचा उलगडा करणारे : तालयोगी पं. सुरेश तळवलकर
पुणे : भारतीय संगीतात शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला ही आत्यंतिक महत्त्वाची अंगे आहेत. तबलासाधक आणि गुरू जानकीराम जगताप यांचे ‘तालचक्र’ हे पुस्तक साधकांसाठी ताल या संगीताच्या अविभाज्य घटकाचा शास्त्रीयतेचा उलगडा करणारे आहे’, असे गौरवोद्गार तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी येथे काढले. लेखक या नात्याने जानकीराम यांच्यापाशी प्रतिपाद्य विषयाची आणि आशयाची स्पष्टता आहे, हे महत्त्वाचे आहे, असेही पं. तळवलकर म्हणाले.
ह. भ. प. जानकीराम जगताप लिखित ‘तालचक्र’ या तबलाविषयक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पं. तळवलकर बोलत होते. हा कार्यक्रम गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्यासह ह. भ. प. श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप, पं. रामदास पळसुले, सूरमणी पं. विजय बक्षी, उद्योजक सुनील मारणे, पं. शारंगधर साठे, विजय महाराज जगताप, सत्यजित तळवलकर तसेच लेखक जानकीराम जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी लेखक आणि तबलासाधक जानकीराम जगताप यांच्या गुरुमाता गोदावरीताई भोयर आणि गायिका पल्लवी पोटे यांचा विशेष सत्कार वृषाली जगताप आणि प्रज्ञा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे निमंत्रक ह. भ. प. विजय महाराज जगताप यांनी तालचक्र पुस्तकाचे प्रकाशन हा फलश्रुतीचा दिवस असल्याचा उल्लेख केला. संगीतामुळे विद्यार्थ्यांची, साधकांची एकाग्रतेची पातळी उंचावते. संगीताचा अभ्यास पाठ्यक्रमाला मारक नसून, पूरक आहे. एकाग्रतेसाठी मनोलय हवा आणि मनोलयासाठी नादसाधना गरजेची असते.
मनोगत मांडताना जानकीराम जगताप म्हणाले, शिकवत असताना लयकारी, रियाज, व्याख्या…अशा अनेक विषयांवर जे सुचले ते मी मांडत गेलो. तेच संकलित करून पुस्तकरूपाने विद्यार्थी वाचकांसमोर ठेवले आहे.
पं. विजय बक्षी म्हणाले, मारणे गावात जगताप यांच्या संस्थेने शून्यातून विश्वनिर्मिती केली आहे. त्यांच्या उपक्रमांतील सातत्य कौतुकास्पद आहे. जानकीराम यांनी तालचक्र पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत लेखन केले आहे. हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात तसेच संदर्भग्रंथ म्हणूनही उपयोगात आणले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पं. रामदास पळसुले म्हणाले, अत्यंत सुगम भाषेत लिहिलेले तालचक्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.
प्रमोद महाराज जगताप यांनी जगताप घराण्याच्या पाच पिढ्यांनी दुर्गम भागात, खेड्यात कला जिवंत ठेवली, याचा उल्लेख केला. जिथे शाळा नव्हती तिथे या मंडळींनी अपार परिश्रमांनी कलाकार घडवले आहेत, असेही ते म्हणाले.
पुस्तकाचा परिचय प्रा. निलेश खळीकर यांनी करून दिला,
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या पूर्वार्धात प्रसिद्ध गायक पं. संजय गरुड यांचे बहारदार गायन झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध तबलावादक पं. सत्यजित तळवलकर यांचे त्रितालातील एकल तबलावादन रंगले. त्यांना अमेय बिच्चू यांनी लेहरासाथ केली. बाळासाहेब चांदेरे, बापूसाहेब जगताप, संदीप जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
