ठरलं! उद्धव ठाकरेच असणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने घेतला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे प्राथमिक सूत्रही निश्चित करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची रणनीती निश्चित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असे स्पष्ट करण्यात आले. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याचे मतदारांमध्ये ठसविण्यासाठी तिन्ही पक्षांची एकत्रित वॉर रूम असेल. महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या सभांना तीनही पक्षांचे नेते उपस्थित असतील, असेही या चर्चेत ठरविण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळणार असून त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे गट जागा लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे सध्या असलेल्या जागा कायम राहणार असून त्या 155 जागा वगळता इतर जागांवर जागा वाटपा दरम्यान चर्चा होणार आहे. निवडून येण्याची क्षमता हा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रमुख निकष असणार आहे.
