व्यसन नको ध्येय बाळगा – सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलींद भोई
पुणे : आज शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. सुरूवातीला विद्यार्थ्यांमध्ये याचे आकर्षण असते आणि नंतर थ्रील वाटू लागते. ते थ्रील कधी व्यसन होते हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. व्यसनी होण्यापेक्षा ध्येयाचे थ्रील बाळगा म्हणजे मनु भाकर आणि स्वप्नील कुसाळे यांच्यासारखे देशाचे नाव उंचवाल, असे मत सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलींद भोई यांनी व्यक्त केले.
मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कॅम्पस) व शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यामाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. युवा पिढीतील वाढती व्यसनाधीनता व अमली पदार्थ सेवन आणि जनजागृती हा व्याख्यानाचा विषय होता. संस्थेच्या विद्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपप्राचार्य डॉ.मिलींद आळंदीकर, प्रा.संगीता मावळे, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते.
डाॅ. मिलींद भोई म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, व्यसनी मित्रांची संगत, व्यसनी पदार्थांचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. मित्रांनी देखील आपल्या मित्र व्यसनाधीन होण्यापासून थांबविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मिलिंद आळंदीकर यांनी प्रास्ताविक केले प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.
