Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सचिन वाझे यांनी टाकला पॉलिटिकल बॉम्ब, देशमुख यांच्यासह जयंत पाटलांचे नाव घेतले

मुंबई: कारागृहात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सबळ पुरावे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे आहेत. तसेच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पुराव्यांसह देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची लेखी माहिती दिली आहे, असे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. 

गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले आणि जामीनावर बाहेर असलेले अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शपथपत्राद्वारे आरोप करण्यास सांगितले. मात्र, आपण त्याला दाद लागू दिली नाही, असा दावा देशमुख यांनी केला आहे. 

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, फडणवीस यांच्या बाबतीत, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, अशी टोकाची भाषा वापरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे आरोप प्रत्यारोप केवळ राजकीय स्वरूपाचे न राहता ते व्यक्तिगत पातळीवर आले आहेत.

तशातच तळोजा कारागृहात असलेले सचिन वाझे मुंबईतील रुग्णालयात तपासणीसाठी आले असता वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी केलेल्या विधानांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील शिमगा आणखीनच रंगणार आहे. 

कायमच वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिकारी वाझे हे 100 कोटी रुपयांच्या खंडणीसह मनसुख हिरेन खून प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या या इमारतीच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी लावून ठेवण्याच्या प्रकरणात आरोपी आहेत. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि पबचालकांकडून शंभर कोटीची वसुली करण्याचे काम आपल्याला दिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर लेखी आरोप केले आहेत. या आरोपांचा पुनरुच्चार करताना वाझे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयसह फडणवीस यांच्याकडेही सगळं पुरावे असल्याचा दावाही केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading